रुग्णांच्या हालअपेष्टांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष: आठ दिवसांत सुविधा सुरळीत न झाल्यास रुग्णांसह आंदोलनाचा रवी जाधव यांचा इशारा ..

⚡सावंतवाडी, ता. १८-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील नव्या अतिदक्षता विभागातील (आयसीयू) वातानुकूलित यंत्रणा गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आयसीयू पूर्णपणे बंदिस्त असल्याने उष्णतेमुळे रुग्ण अक्षरशः गुदमरून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केली आहे.
एसी यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी संबंधित कंपनीचे सुमारे दहा लाख रुपयांचे बिल प्रलंबित असल्याने ही यंत्रणा बंद असल्याचा दावा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. सध्या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या स्टँडिंग फॅनच्या आधारे आयसीयूमधील रुग्णांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. आयसीयू विभागाची ही दयनीय अवस्था का निर्माण झाली, याची सखोल चौकशी करून त्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदन देण्यात येणार असून, प्रसंगी उपोषणाची नोटीसही देण्यात येईल, असे जाधव यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली लिफ्ट उद्घाटनानंतरही अद्याप रुग्णांच्या सेवेत कार्यरत नसल्याची तक्रार आहे. तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातून बांबुळी येथे रुग्णांना रेफर करण्याचे प्रमाणही अपेक्षेप्रमाणे कमी झालेले नसल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. रुग्णालयातील सुविधांबाबत वारंवार आश्वासने दिली जात असली, तरी प्रत्यक्षात सुधारणा दिसत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने संस्था व दात्यांच्या माध्यमातून आतापर्यंत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या रुग्णोपयोगी वस्तू रुग्णालयाला उपलब्ध करून दिल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयातील स्वच्छतागृह व ड्रेनेजची समस्या निर्माण झाल्यानंतर संस्थेच्या रूपा मुद्राळे यांनी स्वखर्चाने ड्रेनेज टाक्यांची साफसफाई करून घेतली होती. तसेच आठ दिवसांपूर्वी आरोग्य सभापती सुधीर आरीवडेकर व नगरपरिषदेच्या सहकार्याने रुग्णालय परिसराची स्वच्छताही करून घेण्यात आली. रुग्णालयातील आयसीयूसह अन्य विभागांतील एसी यंत्रणाही बंद असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी रुग्णालयाच्या अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार आहे. पुढील आठ दिवसांत एसीसह आवश्यक सोयी-सुविधा सुरळीत न झाल्यास रुग्णांसह रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी दिला आहे. दरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी नुकतीच रुग्णालयाला भेट दिली. या दौऱ्याबाबत रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांना पूर्वकल्पना देणे आवश्यक होते; मात्र तशी कोणतीही माहिती देण्यात आली नाही, अशी नाराजी जाधव यांनी व्यक्त केली. रुग्णालयाच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्था व संघटनांनाही या भेटीची माहिती देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालय प्रशासनाने संबंधितांना पूर्वकल्पना देणे आवश्यक होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.”
