मैदानी चाचणी संपली:आता होणार लेखी परीक्षा: पात्र यादी लवकरच होणार प्रसिद्ध
ओरोस ता.१२-“
जिल्ह्यात १२१ पोलीस पदांच्या रिक्त पदासाठी पदवीधर व उच्च शिक्षित तरुणांची उपस्थिती लक्षणीय असून विज्ञान, संगणक विज्ञान, कला, वाणिज्य पदवीधरसह पदव्युत्तर उमेदवारांचा भरणा आहे. विद्या विभूषित उमेदवार आल्याने जिल्हा पोलिस दलाचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली. दरम्यान, मैदानी चाचणी पूर्ण झाली असून ८ हजार ८४ उमेदवारांपैकी ५ हजार ५९४ उमेदवारांनी मैदानी चाचणीला हजेरी लावली आहे.
जिल्हा पोलिस दलातील २२ चालक रिक्त पदासाठी आणि ९९ कॉन्स्टेबल रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १५ डिसेंबर २०२२ पर्यंत यासाठी उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्याची मुदत होती. २२ चालक पदासाठी २१२६ अर्ज आले होते. तर कॉन्स्टेबल पदाच्या ९९ पदांसाठी ५ हजार ९५८ अर्ज आले होते. यासाठी २ जानेवारी २०२३ पासून मैदानी चाचणी सुरू झाली होती. २ ते ४ जानेवारी या कालावधीत चालक पदाची चाचणी परीक्षा घेण्यात आली. तर ५ ते ११ जानेवारी या कालावधीत कॉन्स्टेबल पदासाठी मैदानी चाचणी घेण्यात आली.
२ ते ४ जानेवारी कालावधीत पोलीस दलाच्या सिंधुदुर्गनगरी येथील परेड मैदानावर मैदानी चाचणी पार पडली. यासाठी अर्ज दाखल केलेल्या २१२६ उमेदवारांपैकी १३०४ उमेदवारांनी हजेरी लावली. ८२२ उमेदवार गैरहजर राहिले. तर कॉन्स्टेबल पदासाठी याच मैदानावर ५ ते ११ जानेवारी या कालावधीत मैदानी चाचणी घेण्यात आली. यासाठी अर्ज सादर केलेल्या ५ हजार ९५८ उमेदवारांपैकी ४ हजार २९० उमेदवारांनी हजेरी लावली. तर १६६८ उमेदवारांनी पाठ फिरविली आहे.
चालक पदासाठी २०२७ पुरुष उमेदवारांचे तर ९९ महिला उमेदवारांचे अर्ज आले होते. यातील पुरुष उमेदवार १२४८ उपस्थित राहिले. तसेच ५६ महिला उमेदवार उपस्थित राहिल्या. कॉन्स्टेबल पदासाठी ४ हजार ८५५ पुरुष तर ११०३ महिला उमेदवारांचे अर्ज आले होते. यातील प्रत्येक्षात ४ हजार २९० उमेदवार मैदानी चाचणीसाठी हजर राहिले.
