मालवण (प्रतिनिधी)

आगामी काळात पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर जलसंधारणाच्या उपाययोजनांना विशेष भर दिला जात आहे. याच सामाजिक बांधिलकीतून मालवण नगरपरिषदेच्या वतीने रेवतळे – देऊळवाडा खाडीच्या पुढील भागातील नदीपात्रावर देऊळवाडा सागरी महामार्ग परिसरात बंधारा उभारण्यात आला. या बंधाऱ्यामुळे गोडे पाणी अडवून ते परिसरातील जमिनीत मुरल्यास जमिनीतील जलसाठ्यांना बळ मिळणार आहे. या परिसरात आणखीही काही ठिकाणी बंधारे उभारणी केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पावसाचे पाणी अडवून त्याचा साठा वाढविणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करणे, या दृष्टीने अशा उपाययोजना महत्त्वपूर्ण ठरतात. संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून नगरपरिषदेने पुढाकार घेत जलसंधारणाच्या कामाला चालना दिली जात आहे. पाणी बचत व अन्य उपाययोजना यांनाही प्राधान्य दिले जात आहे, असे यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी सांगितले.
या उपक्रमात नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, समाजकल्याण सभापती सिद्धार्थ जाधव आणि नगरसेविका नीना मुंबरकर तसेच नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक यांनी बंधारा उभारणी मोहिमेत श्रमदान केले.
मालवण नगरपरिषद धामापूर नळपाणी योजनेच्या धामापूर येथील विहिरीच्या बाजूला असलेल्या वहाळावर मालवण नगरपरिषद नळपाणी योजना विभाग यांच्या पुढाकारातून व सहभागातून तसेच धामापूर, काळसे ग्रामपंचायतव व लोकसहभागातून मागील आठवड्यात प्राधान्यक्रमाने बंधारा उभारण्यात आला. मालवण शहराची जलवाहिनी असलेल्या धामापूर नळपाणी योजना विहिरीच्या बाजूला उभारणी करण्यात आलेला हा बंधारा महत्वपूर्ण ठरला, अशी माहिती उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती दीपक पाटकर यांनी दिली आहे.
