Headlines

“‘सिंधुदुर्ग डॉट एआय’मुळे जलसंधारणाला मिळणार तंत्रज्ञानाची जोड” …

मालवण, दि प्रतिनिधी

कोकणात दरवर्षी मुसळधार पाऊस पडत असला, तरीही उन्हाळा सुरू होताच अनेक गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. “भरपूर पाऊस असूनही पाणी का टिकत नाही?”, “जलस्रोतांचे योग्य नियोजन कसे करायचे?”, “वनराई बंधाऱ्यांची देखभाल कोणी व कशी करावी?” आणि “संभाव्य टंचाईग्रस्त गावे वेळेत कशी ओळखायची?” यांसारख्या अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या प्रश्नांवर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक तंत्रज्ञान आणि एआय च्या साहाय्याने मात केली जाणार आहे.
सॉफ्टलॅब कंपनीने विकसित केलेल्या ‘सिंधुदुर्ग डॉट एआय’ या डिजिटल प्रणालीचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. एआय हवामानविषयक माहिती, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि लोकसहभाग यांची सांगड घालत सिंधुदुर्गाच्या जलव्यवस्थापनाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.
या प्रणालीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याच्या निर्मितीत सिंधुदुर्गातील स्थानिक संगणक अभियंते आणि तरुणांच्या कौशल्याचा वापर करण्यात आला आहे. सॉफ्टलॅबने या स्थानिक प्रतिभेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन हे व्यासपीठ तयार केले आहे.
‘सिंधुदुर्ग डॉट एआय’ हे मोबाईलवर ॲपप्रमाणे सहज वापरता येणारे डिजिटल व्यासपीठ आहे. जिल्ह्यातील जलस्रोत, वनराई बंधारे, शोषखड्डे, पाणीटंचाईची सद्यस्थिती, शासकीय योजना आणि नागरिकांच्या समस्या यांची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. असे सॉफ्टलॅब प्रमुख मिथिलेश बांदिवडेकर यांनी सांगितले.
जलसंधारणासाठी बांधलेले बंधारे दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यांची नियमित देखभाल महत्त्वाची असते. बंधाऱ्यांची पोती खराब होणे, गळती लागणे किंवा पाणी साठवण कमी होणे या बाबी नागरिकांनी ॲपवर फोटोसह अपलोड केल्यास, संभाव्य त्रुटी ओळखून वेळेत दुरुस्ती करणे ग्रामपंचायत व प्रशासनाला सोपे जाईल.
भविष्यात विहिरी, तलाव व जलस्रोतांमध्ये सेन्सर बसवून पाण्याच्या पातळीचा रिअल-टाईम डेटा मिळवला जाईल. एआय च्या मदतीने तापमान, पर्जन्यमान आणि मागील वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास करून कोणता जलस्रोत आधी आटू शकतो, याचा अचूक अंदाज बांधता येईल. जमिनीतील ओलावा आणि जलस्रोतांच्या आसपासच्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी ड्रोन आणि थर्मल कॅमेऱ्यांची मदत घेण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.
उन्हाळ्यात टंचाई निर्माण झाल्यावर टँकर पाठवण्यापेक्षा, आधीच टंचाईग्रस्त गावे ओळखून उपाययोजना करण्यावर भर दिला जाईल. नागरिक ॲपवरून थेट पाणीटंचाईची नोंद व टँकरची मागणी नोंदवू शकणार आहेत.
ही प्रणाली केवळ पाणीटंचाईपुरती मर्यादित नसून हवामानातील बदलांचा आंबा, काजू व अन्य पिकांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी ही प्रणाली शेतकऱ्यांना मार्गदर्शन करेल. शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना, कागदपत्रे व मदतीची माहिती मिळण्यासाठी व्हॉट्सॲप संवादात्मक सुविधा विकसित केली जात आहे. नागरिक, ग्रामसेवक व स्वयंसेवक स्वतः गावातील समस्या, फोटो आणि सूचना पोस्ट करू शकतील. यावर एकत्रित चर्चा होऊन प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला जाईल.
सॉफ्टलॅबचे प्रमुख मिथिलेश बांदिवडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद पाटकर, मुख्य विपणन अधिकारी विजय केनवडेकर यांनी स्पष्ट केले की, या प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी या संकल्पनेचे स्वागत करत, सेन्सर बसवण्याची ठिकाणे आणि सरकारी डेटाचा प्रभावी वापर करण्यासाठी प्रशासनासोबत विशेष बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
केवळ बंधारे बांधून पाणीटंचाई मिटणार नाही, तर पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे आणि जलस्रोतांची देखभाल करणे आवश्यक आहे. ‘सिंधुदुर्ग डॉट एआय’ प्रणालीच्या माध्यमातून नागरिक, प्रशासन आणि तंत्रज्ञान एकत्र आले, तर सिंधुदुर्ग जिल्हा जलसंधारणात संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श ‘दीर्घकालीन मॉडेल’ ठरण्याची शक्यता आहे.

You cannot copy content of this page