Headlines

हरिहरेश्वर मंदिराशेजारील घरात घुसलेल्या महाकाय अजगराला जीवदान…

सर्पमित्रांच्या तत्परतेने नैसर्गिक अधिवासात मुक्त…

मालवण दि प्रतिनिधी

मालवण, येथील हरिहरेश्वर मंदिराशेजारी असलेल्या दामले यांच्या घरात एक महाकाय अजगर घुसल्याची घटना घडली. दामले कुटुंबाने प्रसंगावधान राखून तात्काळ ‘वाइल्ड लाईफ रेस्क्यूअर’च्या सल्लागार व सर्पमित्र शिल्पा खोत यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच सौ. खोत आणि सर्पमित्र तेजस नार्वेकर यांनी घटनास्थळी धाव घेत या महाकाय अजगराला सुखरूप जेरबंद केले व नंतर त्याला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले.

अनेकदा नागरिक अजगर आणि अत्यंत विषारी असलेल्या ‘घोणस’ या सापातील फरक ओळखू शकत नाहीत. अजगर समजून लोक नकळत घोणस सापाजवळ जाण्याची आणि अपघात घडण्याची मोठी शक्यता असते. हा संभाव्य धोका लक्षात घेऊनच सौ. खोत यांनी वेळ न घालवता तात्काळ घटनास्थळी पोहोचण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने तो विषारी साप नसून अजगरच असल्याचे निष्पन्न झाले.

हवामानामध्ये होणाऱ्या बदलांमुळे आणि वातावरणातील फरकामुळे सध्या सर्प किंवा इतर सरपटणारे जीव बिळांतून बाहेर पडत आहेत,” अशी माहिती शिल्पा खोत यांनी दिली. तसेच, “घरात किंवा परिसरात साप आढळून आल्यास घाबरून न जाता किंवा स्वतः त्याच्या जवळ न जाता तात्काळ जवळच्या अधिकृत सर्पमित्रांना संपर्क साधावा,” असे आवाहन ‘वाइल्ड लाईफ रेस्क्यूअर’च्या सल्लागार शिल्पा खोत यांनी नागरिकांना केले आहे.

You cannot copy content of this page