Headlines

मालवण सोमवारपेठेतील श्री हनुमान मंदिरात गणेशोत्सवनिमित्त २४ ते ३० ऑक्टोबरदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

⚡मालवण ता.१७-:
मालवण येथील सोमवार पेठेतील श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यंदा गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २४ ऑक्टोबर ते शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत भजन, डबलबारी सामना, दशावतारी नाट्यप्रयोग, लघुरुद्र, अथर्वशीर्ष पठण, महाआरती आणि महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी भाविकांना अनुभवता येणार आहे.

शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून श्री सत्यनारायण महापूजा व तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजता सुश्राव्य भजन होणार असून, रात्री १० वाजता २० बाय २० आमने-सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना रंगणार आहे. श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, कुडाळ-भरणीचे बुवा विनोद चव्हाण आणि महाडेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नादान (ता. देवगड) यांचे बुवा संदीप पुजारे यांच्यात हा सामना होईल. यावेळी ‘गणपती आणि यमधर्म युद्ध’ हे भारुड खास आकर्षण ठरणार आहे.

सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुश्राव्य भजन होईल. रात्री १० वाजता श्री दत्त माऊली संयुक्त दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग यांचा पारंपरिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. ‘वाक्रकली अम्मन (अर्थात चतुरंग)’ हे नाटक यावेळी सादर केले जाणार आहे.

मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता लघुरुद्राचे आयोजन करण्यात आले असून, रात्री १० वाजता प्रसिद्ध मराठी चित्रपट दाखविण्यात येणार आहे. बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता देवगड येथील वारकरी भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री १० वाजता मराठी चित्रपटाचे दाखविण्यात येणार आहे.

गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी अथर्वशीर्ष पठण आणि सहस्र दुर्वा अर्पण करण्यात येणार आहे. रात्री ७.३० वाजता श्री महालक्ष्मी बाळ गोपाळ मंडळ, रेवतळे यांच्या सौजन्याने महाआरती होणार आहे.

शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६.३० वाजता कणकवली येथील सिंधुगर्जना ढोल-ताशा पथकाच्या गजरात तसेच पारंपरिक चलचित्र देखाव्यांसह श्री गणरायाची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.

या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी आणि गणेशभक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page