बांदा बाजारपेठ जिल्हा परिषद शाळेच्या पालकांनी लावला फलक
बांदा/प्रतिनिधी
बांदा बाजारपेठेत असलेल्या जिल्हा परिषद केंद्रशाळेची पटसंख्या ३०० हून अधिक असल्याने सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेत चारचाकी वाहनांना १५ मिनिटे प्रवेश बंदी करण्यासाठी पालकांनी पुढाकार घेत मार्गदर्शक फलक उभारला. यावेळी पालक व व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याठिकाणी स्वतः थांबून वाहतूक थांबविली. शाळेतील विद्यार्थी मार्गस्थ झाल्यानंतरच वाहनांना प्रवेश देण्यात आला.
जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या अधिक असल्याने सायंकाळी शाळा सुटल्यानंतर याठिकाणी विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी होती. बाजारपेठेत जाणारा रस्ता असल्याने वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यामुळे नेहमीच याठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. यासाठी शाळा सुटण्याच्या वेळेत चारचाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय पालकांनी घेतला.
त्यानुसार बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावर काणेकर यांच्या घरासमोर फलक लावून वाहतूक रोखण्यात आली. १५ मिनिटांनंतर वाहतूक पूर्ववत सुरु करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, पालक हेमंत दाभोलकर, राकेश केसरकर, हेमंत मोर्ये, सुशांत ठाकूर, डॅनी आलमेडा, रिया आलमेडा यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
