मध्यामांमध्ये येणाऱ्या बातम्या चुकीच्या;कसाल सरपंच राजन परब यांनी केली भूमिका स्पष्ट
ओरोस ता.१०-:
मी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कार्यकर्ता आहे. मी इतर कोणत्याही पक्षात गेलेलो नाही. शिंदे गटात आपण गेलो अशा प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या पूर्णपणे खोट्या आहेत, अशी प्रतिक्रिया कसालचे नवनिर्वाचित सरपंच राजन परब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.
कसाल नवनिर्वाचित सरपंच तथा माजी पंचायत समिती सदस्य राजन परब हे राणे समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ते अपक्ष म्हणून सरपंच निवडणूक लढले आणि जिंकूनही आले. या निवडणुकित त्यांनी भाजपा उमेदवाराचा ६० मतांनी पराभव केला. या निवडणूक निकालानंतर राजन परब हे शिंदे गटात गेले अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या बाबत राजन परब यांनी प्रतिक्रिया देताना “मी शिंदे गटामध्ये गेलो, अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. मात्र अशा प्रकारचा कोणत्याही निर्णय मी अद्याप घेतलेला नाही. कुडाळच्या शिंदे गटाच्या कार्यक्रमाला मी उपस्थित नव्हतो. तरीही कसाल सरपंच राजन परब शिंदे गटात अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे. मात्र त्या संदर्भात माझा कोणताही संबंध नाही. मी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे अन्य कोणत्याही पक्षात किंवा गटामध्ये जाण्याचा माझा प्रश्नच येत नाही. किंबहुना तसा कोणताही निर्णय मी अद्याप घेतलेला नाही.
कसाल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी मी अपक्ष म्हणून लढलो आणि कसाल मधील माझ्या सर्व मतदार बंधू, भगिनी, माता गावातील प्रतिष्ठित, वरिष्ठ या सर्वांनी मला सरपंच म्हणून निवडून दिले आहे. हे माझ्यावर असलेले माझ्या गावातील सर्वांचे प्रेम आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर बऱ्याच जणांनी माझे अभिनंदन केले आणि मला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यामध्ये शिंदे गटाचे चंद्रशेखर राणे हेही होते. ते माझे मित्र आहेत, त्यांनीही माझे अभिनंदन केले. इतर सर्वांनी जसे अभिनंदन केले तसेच त्यांनीही केले म्हणजे त्याचा अर्थ मी शिंदे गटात गेलो असा होत नाही. मी अद्यापही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचाच कार्यकर्ता आहे, असे राजन परब यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
