बांदा/प्रतिनिधी
वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या प्रसिद्ध साहित्यिक (कै.) प्र. श्री. नेरुरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खुल्या वाचक स्पर्धेत शुभेच्छा सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला. नेत्रा राणे यांनी द्वितीय, तर रीना मोरजकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला. शमिका नाईक यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
वाचनप्रेरणा दिनानिमित्त समस्त नेरुरकर परिवार पुरस्कृत या स्पर्धेची सुरुवात दीपप्रज्वलन करून तसेच सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांतील स्पर्धकांसाठी आयोजित या स्पर्धेत साहित्यिक वि. वा. शिरवाडकर आणि व. पु. काळे यांच्या साहित्यकृतींपैकी एका पुस्तकावर स्पर्धकांनी परीक्षणात्मक विवेचन केले. प्रत्येक स्पर्धकाला सादरीकरणासाठी दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला होता.
स्पर्धकांनी निवडलेल्या साहित्यकृतींचा आशय, त्यातील विचार आणि साहित्यिक वैशिष्ट्ये आपल्या प्रभावी मांडणीतून उलगडली. या स्पर्धेमुळे वाचनाची आवड जोपासण्याबरोबरच पुस्तकांचे चिकित्सक वाचन आणि साहित्याविषयी विचार मांडण्याची संधी वाचकांना मिळाली.
स्पर्धेचे परीक्षण बाळकृष्ण राणे यांनी केले. यावेळी नट वाचनालयाचे उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, कार्यवाह राकेश केसरकर, अनंत भाटे, इन्सुली हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक लहुराम गावडे, ग्रंथपाल सुस्मिता नाईक यांच्यासह वाचक व साहित्यप्रेमी उपस्थित होते. आभार राकेश केसरकर यांनी मानले.
नट वाचनालयाच्या या उपक्रमातून वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यास आणि नव्या पिढीमध्ये साहित्याविषयी आवड निर्माण होण्यास हातभार लागणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
फोटो:-
बांदा नट वाचनालयात आयोजित खुल्या वाचक स्पर्धेतील विजेत्यांसोबत उपस्थित असलेले वाचक.

