Headlines

“अनंत भाटे यांना उत्कृष्ट वाचक पुरस्कार”…

बांदा/सकाळ वृत्तसेवा
भारताचे माजी राष्ट्रपती, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि थोर विचारवंत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त बांदा येथील नट वाचनालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाचनालयाच्या वतीने दिला जाणारा सन २०२६ चा उत्कृष्ट वाचक पुरस्कार अनंत भाटे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत यांनी वयाची ९२ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचाही शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी उत्कृष्ट वाचक पुरस्कार स्वीकारल्यानंतर अनंत भाटे यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.
वाचनातून व्यक्तिमत्त्व विकासाला चालना
अनंत भाटे म्हणाले की, वाचन ही केवळ माहिती मिळविण्याची प्रक्रिया नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन आहे. पुस्तकांमुळे माणसाच्या विचारांना दिशा मिळते, ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन समृद्ध होतो. आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरामुळे वाचनाची सवय कमी होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत वाचनालयांचे महत्त्व अधिक वाढले आहे. तरुण पिढीने नियमित वाचनाची सवय लावून घ्यावी, तसेच ग्रंथालयांशी आपले नाते अधिक दृढ करावे, असे आवाहन त्यांनी केले. वाचनालयाकडून मिळालेला उत्कृष्ट वाचक पुरस्कार हा आपल्यासाठी आनंदाची आणि प्रेरणेची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या निमित्ताने अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या प्रदीर्घ कार्याचा आणि वाचनालयाशी असलेल्या त्यांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांचा गौरव करण्यात आला. वयाच्या ९२ व्या वर्षातही त्यांचा उत्साह आणि वाचनालयाप्रती असलेली बांधिलकी उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली.
यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक शंकर नार्वेकर, जगन्नाथ सातोस्कर, गुरुनाथ नार्वेकर, लहुराम गावडे, स्वप्निता सावंत, ग्रंथपाल सुस्मिता नाईक, मिताली सावंत, जे. डी. पाटील, महादेव वसकर, नागेश सावंत आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव राकेश केसरकर यांनी केले, तर आभार सहसचिव हेमंत मोर्ये यांनी मानले. यावेळी वाचक, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
फोटो:-
बांदा नट वाचनालयात उत्कृष्ट वाचक पुरस्कार अनंत भाटे यांना प्रदान करताना मान्यवर.

You cannot copy content of this page