Headlines

ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सीत नारीशक्तीचा जागर

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान

कुडाळ : नवरात्रोत्सव हा उत्सवाचा आणि नारीशक्तीच्या सन्मानाचा प्रतीकात्मक सोहळा आहे. आदिशक्तीचा जागर करताना महिला आणि मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा कुडाळमधील ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सीचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन समाजसेविका कीर्ती तटकरे यांनी केले.
कुडाळ शहरातील सांगिर्डेवाडी येथे युवा उद्योजक संतोष वालावलकर कुटुंबीय पुरस्कृत ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी आणि सिद्धिविनायक कॉलनी यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त नऊ दिवस विविध कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे परिसरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण निर्माण झाले आहे.
उत्सवाच्या पाचव्या दिवशी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान तसेच विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक तेंडुलकर, पत्रकार अजय सावंत, कथक विशारद व युवा उद्योजिका मृणाल सावंत, ज्येष्ठ उद्योजक महारुद्र गाताडे, शिक्षक व गणिततज्ज्ञ ओंकार तेंडुलकर, गायक युसुफ आवटी आणि गायिका सपना यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना कीर्ती तटकरे यांनी नवरात्रोत्सवातून नारीशक्तीचा सन्मान करण्याबरोबरच महिला आणि बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. मृणाल सावंत यांनी, वालावलकर कुटुंबीय आणि ड्रीम स्क्वेअर रेसिडेन्सी व सिद्धिविनायक कॉलनी यांच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मुलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात असल्याचे सांगितले. सर्व स्तरांतील व्यक्तींचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी नमूद केले. महारुद्र गाताडे यांनी उत्सवाला शुभेच्छा दिल्या.
गेल्या चार दिवसांत आयोजित विविध स्पर्धांतील विजेत्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. नृत्य स्पर्धेत रूही वालावलकर हिने प्रथम, आर्या गवस व यशस्वी भुरटे यांनी द्वितीय, तर अन्वी खंडागळे व आत्मिक देसाई यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
कार्यक्रमाला मनीषा वालावलकर, संतोष वालावलकर, महेश प्रभू, आनंद जामसंडेकर, योगिता वालावलकर, सीमा शिंदे, भास्कर वैद्य, तेजल वालावलकर, शांभवी परब, दुर्वा बांदेकर, पल्लवी डिगसकर, सुप्रिया धामापूरकर, अर्चना करंगुटकर, पूजा नाईक, प्रीती पाटकर, नीलम सातोसकर, श्रावणी करंगुटकर यांच्यासह सिद्धिविनायक कॉलनीतील महिला, पुरुष आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष वालावलकर यांनी केले.

आज मृणाल सावंत यांचा नृत्याविष्कार

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आज, १७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत यांचा नृत्याविष्कार सादर होणार आहे. त्यानंतर लहान मुलांसाठी मनोरंजक खेळ आणि गरबा रास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page