आचरा मॅनेजमेंट आणि वाणिज्य कॉलेजचे वायंगणी येथे श्रमसंस्कार शिबिर सुरू

मालवण दि प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठ अंतर्गत आचरा मॅनेजमेंट स्टडीज आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘युवकांचा ध्यास : ग्राम-शहर विकास’ शिबीराचा वायंगणी तळेवाडी (ता. मालवण) येथे सोमवारपासून प्रारंभ झाला. या शिबीराची १५ जानेवारी रोजी सांगता होणार आहे.

प्रगतीची नवीन क्षितीजे पादाक्रांत करताना महविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजाच्या सुख-दुःखाचीही जपणूक करावी व स्वत:च्या सर्वांगीण विकासाबरोबरच समाजाच्या आशा आकांक्षांनाही सत्यात आणण्यासाठी प्रयत्नशील राहावे, यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

युवा प्रबोधन व दिशादर्शन करणे, नेतृत्व गुणाना संधी देणे, श्रमसंस्कारातून आरोग्याचे महत्व सांगणे, सामाजिक जबाबदारीचे भान निर्माण करणे, जलसंवर्धन व पर्यावरण याबद्दल जाणीव निर्माण करणे, ग्रामीण जीवनाच्या समस्या व उपाययोजनांबद्दल चर्चा करणे, बालसंस्कार, आरोग्य यांचा प्रसार करणे आदी उद्दिष्ट्ये या शिबिराच्या केंद्रस्थानी आहेत.

ग्रामस्वच्छता आणि रस्ते डागडुजी, पाणी व्यवस्थापन आणि जलसंधारण, युवा पालक मार्गदर्शन, आपत्ती व्यवस्थापन, सांस्कृतिक वारसा व दुर्लक्षित पर्यटन आदी प्रकल्पकार्ये शिबिराच्या माध्यमातून केली जाणार आहेत. शिबिरात मोबाईलच्या युगात वाचनाचे महत्व, युवकांचे राष्ट्रीय सेवेतील महत्व, आकाश दर्शन, युवकांचे आरोग्य, पर्यटन व्यवस्थापन आदी विषयांवर वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

You cannot copy content of this page