कांदळगाव येथे ‘संवाद किशोरवयीन मुलांशी’ कार्यक्रम संपन्न

⚡मालवण ता.१०-: बॅ. नाथ पै सेवांगण संचालित कौटुंबिक सल्ला केंद्र, मालवण यांच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिन व स्त्रीमुक्ती दिनाचे औचित्य साधून ओझर विद्यामंदिर, कांदळगाव मालवण येथे ‘संवाद किशोरवयीन मुलांशी’ हा कार्यक्रम संपन्न झाला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बाल कल्याण समिती सदस्या, सिंधुदुर्ग अॅड. लीना नेवगी या उपस्थित होत्या. चारुशीला देऊलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करीत उपस्थित विद्यार्थी वर्गाला कुमारवय म्हणजे काय, या वयात मुलांचे वर्तन याविषयी उपस्थित मुलांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अँड लीना नेवगी यांनी बालकांकडून कळत नकळतपणे होणारे गैरवर्तन, पालकांचे न ऐकणे तसेच चुकीच्या वर्तनाला बळी पडणे, मोबाईलचा गैरवापर या गोष्टी मुलांच्या बाबतीत घडत असतात. या लहान वयात मुलांनी चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात, नवनवीन ज्ञान शिकावे असे सांगत विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन केले. एखादे गैरकृत्य होत असल्यास आपल्या पालकांशी किंवा शिक्षकांशी त्याबाबत बोलणे महत्वाचे असल्याचे सांगितले. तसेच आपले वर्तन चुकीचे आहे की बरोबर आहे, हे स्वतःचे स्वतः पडताळून पाहता येणे ‘शक्य असल्याचेही त्यांनी मुलांना सांगितले. तसेच बालकांसाठी सुद्धा कायदा असून पोक्सो कायद्याची माहिती त्यांनी मुलांना दिली. आपल्या जिल्ह्यामध्ये बाल कल्याण समिती, बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन या सारखे बालकांच्या समस्यांसाठी कार्यरत असल्याचे सांगत मुलांशी संवाद साधला.

या कार्यक्रमास ओझर विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रतापराव खोत, शिक्षक प्रवीण पारकर, कौटुंबिक सल्ला केंद्राचे समुपदेशक मनोजकुमार गिरकर, अदिती कुडाळकर, विजय कुडाळकर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. आभार प्रवीण पारकर यांनी मानले.

You cannot copy content of this page