ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांचे प्रशासक यांना निवेदन
⚡मालवण ता.०९-: मालवण शहरातील विविध ठिकाणच्या सार्वजनिक शौचालये व स्वच्छता गृहे नादुरुस्त होऊन त्यांची दुरावस्था झाली आहे. यामुळे नागरिक, महिला व पर्यटकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे ही शौचालये व स्वच्छता गृहे सुस्थितीत करण्यात यावीत अशी मागणी शिवसेनेचे मालवण शहरप्रमुख बाबी जोगी यांनी मालवण नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. हे निवेदन नगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक महेश परब यांनी स्वीकारले
दरम्यान, जोगी यांच्या मागणीची दखल घेऊन श्री परब यांनी मच्छी मार्केटनजीकच्या समुद्र किनारी बायोटॉयलेटची व्यवस्था केली असून शहरात खराब झालेली शौचालये लवकरच दुरुस्त करण्यात येतील असे आश्वासन दिले आहे.
मालवण शहरातील सोमवार पेठ येथील शौचालय, मोरेश्वर येथील शौचालय, फोवकांडा पिंपळ येथील शौचालय, मच्छीमार्केट येथील स्वच्छता गृह आदी नादुरुस्त झाले असून ते सुस्थितीत करून त्यांचा परिसरही सुस्थितीत करावा, याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष घालावा, अशी मागणी बाबी जोगी यांनी निवेदनात केली आहे. निवेदन सादर करतेवेळी बाबी जोगी यांच्यासह राजू कुर्ले, दिवा जोशी, नरेश हुले आदी उपस्थित होते. जोगी यांच्या मागणी नंतर श्री परब यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही केली आहे. मच्छी मार्केट येथील स्वच्छता गृह नादुरुस्त बनल्याने मच्छी विक्रेत्या महिलांची गैरसोय होत असल्याने मच्छी मार्केट नजीकच्या समुद्र किनारी नगरपालिकेकडून बायोटॉयलेट उपलब्ध करण्यात आले आहे.
