आगार व्यवस्थापक बोवलेकर यांचे सुरेश बापर्डेकर यांना आश्वासन
मालवण दि प्रतिनिधी
मालवण आगारातून देवबाग साठी सुटणाऱ्या बसफेऱ्या वेळेत सुटत नसल्याबाबत तसेच देवबाग मार्गावर मिनीबस सोडण्यात यावी या मागणीसाठी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा तारकर्ली येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी दिल्यानंतर आज मालवणचे आगार व्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांच्याशी सुरेश बापर्डेकर व ग्रामस्थ यांनी केलेल्या चर्चेत आगार व्यवस्थापक बोवलेकर यांनी सकाळी सव्वा सहा वाजता देवबाग फेरी सोडण्याचे व इतर बसफेऱ्या वेळेत सोडण्याचे आश्वासन दिले.
देवबाग बसफेरी बाबतच्या समस्यांविषयी सुरेश बापर्डेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून आवाज उठवत विविध मागण्यांबाबत मालवण एसटी आगारासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आज सुरेश बापर्डेकर यांच्यासह देवबाग तारकर्लीचे ग्रामस्थ आणि आगारव्यवस्थापक सचेतन बोवलेकर यांच्यात चर्चा झाली. यावेळी प्रसाद बापर्डेकर,देवांग तारी ,प्रशांत निकम,मेघनाथ मयेकर, वैभव सावंत ,बजरंग कुबल, प्रतीक कुबल आदी उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी देवबागची सकाळची पहिली फेरी सव्वा सहा वाजता वेळेत सोडावी अशी मागणी केली. तसेच बसच्या विलंबामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून बस मध्ये विद्यार्थ्यांना प्राधान्याने घेण्यात यावे असेही सांगितले. तसेच देवबाग मार्गावर मोठ्या बस सोडल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत असल्याने तसेच बस ला विलंब होत असल्याने या मार्गावर मिनी बस सुरू कराव्यात अशी मागणीही केली. यावर आगारव्यवस्थापक बोवलेकर यांनी उद्यापासून सकाळी वेळेत सव्वा सहा वाजता देवबाग बस सोडण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच आगाराकडे मिनी बस उपलब्ध नसून त्या मिळण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा सुरू आहे, ग्रामस्थांनी मिनी बससाठी मागणीपत्र आगाराकडे सादर करावे, ते वरिष्ठांकडे पाठवून पाठपुरावा करण्यात येईल असेही बोवलेकर म्हणाले.
