आकर्षक सजावट, महाप्रसाद आणि अभंग फुगड्यांनी रंगत..

⚡बांदा ता.१७-: सह्याद्रीच्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथे ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या एकजुटीतून शारदोत्सव उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शारदोत्सवासाठी माजी विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या सहभागामुळे शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत शाळा आणि माजी विद्यार्थ्यांची नाळ पुन्हा घट्ट झाली.
शारदोत्सवानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली होती. ज्ञानदेवता सरस्वतीची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध सांस्कृतिक उपक्रम सादर केले. अभंग फुगड्यांनी कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण केले. पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत विद्यार्थ्यांनी व व ग्रामस्थांनी सादर केलेल्या अभंग फुगड्यांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
शारदोत्सवानिमित्त ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांसह पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे महाप्रसादाचा लाभ घेतला. या निमित्ताने शाळेच्या प्रांगणात स्नेह, आपुलकी आणि एकोप्याचे वातावरण निर्माण झाले.
शाळेतील विविध उपक्रमांना ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थ्यांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद ही घारपी शाळेची मोठी ताकद ठरत आहे. ‘विद्यार्थी गुणवत्ता केंद्रस्थानी आणि शिक्षण सर्वांच्या सहभागातून’ या विचाराला अधोरेखित करणारा हा शारदोत्सव विद्यार्थ्यांना संस्कृती, परंपरा, सामूहिक सहभाग आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार देणारा ठरला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. मुख्याध्यापक जे. डी. पाटील तसेच सहकारी शिक्षक आशिष तांदुळे व धर्मराज खंडागळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
ग्रामस्थांची एकजूट, माजी विद्यार्थ्यांची शाळेशी जपलेली नाळ आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे घारपी शाळेतील शारदोत्सव हा संस्कृती, संस्कार आणि लोकसहभागाचा सुंदर संगम ठरला.
