संजू परब: आरोग्य विभागाचे ओएसडी स्वप्निल सांगळे यांचे केले स्वागत तर देव्या सूर्याजी ने देखील वेधले विविध समस्यांबाबत लक्ष..

⚡सावंतवाडी ता.१७-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाचे ओएसडी स्वप्निल सांगळे यांनी सखोल पाहणी करून रुग्णालयातील विविध समस्या जाणून घेतल्या. त्यांनी रुग्णालयातील प्रत्येक कक्षात जाऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान काही बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या असून, त्यातील त्रुटी दूर करण्याबाबत त्यांनी सकारात्मक आश्वासन दिले.रुग्णालयातील बंद असलेले एसी तसेच अन्य आवश्यक सुविधा येत्या पंधरा दिवसांत कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून तेथील अडचणी समजून घेतल्याने रुग्णालयाच्या कामकाजात लवकरच सकारात्मक बदल दिसून येईल, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी व्यक्त केला.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ज्या विश्वासाने ओएसडी स्वप्निल सांगळे यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या पाहणीसाठी पाठविले, त्याप्रमाणे त्यांनी प्रत्यक्ष प्रत्येक विभागाची पाहणी करून समस्या जाणून घेतल्या आहेत. पाहणीदरम्यान दिलेली आश्वासने निश्चितच पूर्ण केली जातील आणि आगामी काळात रुग्णालयातील आरोग्यविषयक प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला.यावेळी संजू परब यांनी ओएसडी स्वप्निल सांगळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच रुग्णालयातील समस्यांची प्रत्यक्ष पाहणी करून त्या जाणून घेतल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. यावी नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी देखील रुग्णालयातील विविध समस्यांबाबत लक्ष वेधले.
