Headlines

कुडाळमध्ये सोमवारी दुर्गामाता दौड…

१६ कर्तबगार महिलांचा होणार सन्मान:महिलांच्या लाठीकाठी, तलवारबाजी व दांडपट्ट्याची प्रात्यक्षिके..

⚡कुडाळ ता.१७-: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने, संभाजी भिडे गुरुजी यांच्या संकल्पनेतून नवरात्रोत्सवानिमित्त कुडाळ येथे सोमवार, १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. भक्ती, शक्ती, सुसंस्कार आणि धर्मजागृतीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात महिला आणि पुरुषांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दुर्गामाता दौड ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून तरुण पिढीमध्ये भक्तिभाव, शौर्य, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारी पदयात्रा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासातील शौर्य, पराक्रम आणि विचारांची प्रेरणा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हा या दौडीमागील प्रमुख उद्देश आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शक्तीची उपासना आणि राष्ट्रप्रेरणेचा जागर करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कुडाळ येथे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकांनी या दौडीची माहिती दिली. सोमवारी सकाळी ८ वाजता आई केळबाई मंदिर येथून दुर्गामाता दौडीला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर कुडाळ बाजारपेठ आणि छत्रपती शिवाजी महाराज नगर मार्गे ही दौड जिजामाता चौक येथे पोहोचेल. तेथे दौडीचा समारोप होणार आहे.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १६ कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच कणकवली तालुक्यातील बिडवाडी येथील महिलांकडून लाठीकाठी, तलवारबाजी आणि दांडपट्टा यांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. या माध्यमातून महिलांचे धैर्य, आत्मविश्वास आणि युद्धकलेतील कौशल्य अधोरेखित केले जाणार आहे. याशिवाय विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
या दुर्गामाता दौडीच्या माध्यमातून शिवइतिहास, संस्कार आणि शक्तीच्या उपासनेचा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे कुडाळ परिसरातील महिला, पुरुष आणि शिवप्रेमींनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेला उन्मेषा दाभोलकर, पद्मा वेंगुर्लेकर, श्वेता बेलेकर-सावंत, भावना वेळकर, बंड्या सावंत, श्रीकृष्ण शिरोडकर, रमाकांत नाईक, विवेक पंडित, शिवम म्हाडेश्वर आणि आनंद वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page