भालचंद्र केळुसकर व गौरव ओरसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती*
*💫मालवण दि.०९-:* अष्टपैलू कलानिकेतन मालवण आणि स्वराध्या फाऊंडेशन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचा नागरी सत्कार व प्रकट मुलाखातीचा ‘सलाम गंगाराम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अष्टपैलु कलानिकेतन मालवणचे अध्यक्ष भालचंद्र केळुसकर व स्वराध्या फाऊंडेशनचे गौरव ओरसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मालवण येथे आयोजित पत्रकार परिषदेस हरी चव्हाण, भाऊ सामंत, शिवा जाधव, अभय कदम, सुनील परुळेकर आदि उपस्थित होते. वस्त्रहरण या मालवणी नाटकामुळे मालवणी भाषा सातासमुद्रापार पोहचली. या अजरामर मालवणी नाटकाला यावर्षी १६ फेब्रुवारीला ४१ वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच नाटकाचे लेखक गंगाराम गवाणकर यांचा नुकताच ८० वा वाढदिवस साजरा झाला. या दोन्ही गोष्टींचे औचित्य साधून १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे चा मुहूर्त साधून स्वराध्या फाउंडेशन व अष्टपैलू कलनिकेतनच्या संयुक्त विद्यमाने सलाम गंगाराम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वस्त्रहरण नाटक कसे निर्माण झाले, त्यातील अडचणी, पात्रे व त्यांच्या गमती जमती आदी अनेक पडद्या मागच्या गोष्टी या कार्यक्रमातून नाट्य रसिकांसमोर गवाणकर यांच्या मुलाखतीमधून उलगडण्यात येणार आहेत, असेही यावेळी केळुसकर यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास नटवर्य दिपक परब, गझलकार मधुसूदन नानिवडेकर, स्वराध्या फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशांत पवार आदिंची उपस्थिती असणार आहे, तरी नाट्य रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.
