पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन:सलग आठव्या वर्षी आयोजन,महिला बचत गट आणि गृहउद्योगांना मोफत स्टॉलची संधी..

⚡कणकवली ता.१९-: स्थानिक महिला बचत गट, गृहउद्योग आणि लघुउद्योजकांनी तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कणकवली शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने यावर्षी दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. ३ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे हा दिवाळी बाजार भरविण्यात येणार आहे. या उपक्रमाचे हे सलग आठवे वर्ष असून, या दिवाळी बाजाराचे उद्घाटन पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती नगरसेविका मेघा गांगण यांनी समीर नलावडे मित्रमंडळ कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नगरसेविका मेघा गांगण, प्रतिक्षा सावंत, आर्या राणे, मनस्वी ठाणेकर, स्वप्नील राणे, संजय कामतेकर, बंडू हर्णे, शहराध्यक्ष अण्णा कोदे, प्राची कर्पे, प्रियाली कोदे, साक्षी वाळके आदी उपस्थित होते.
महिला बचत गट आणि गृहउद्योगातील अनेक महिला घरच्या घरी दर्जेदार दिवाळी फराळ, खाद्यपदार्थ, सजावटीच्या वस्तू तसेच विविध हस्तकला उत्पादने तयार करतात. मात्र, अनेकदा या वस्तूंना योग्य बाजारपेठ मिळत नाही. ही अडचण लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांपासून दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षीही हा उपक्रम राबविण्यात येणार असून, स्थानिक उत्पादकांना आपल्या वस्तूंची थेट विक्री करता यावी, हा त्यामागील मुख्य उद्देश असल्याचे मेघा गांगण यांनी सांगितले.
या दिवाळी बाजारात घरगुती दिवाळी फराळ, विविध खाद्यपदार्थ, रांगोळी, मेहंदी तसेच दिवाळीसाठी आवश्यक असलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. कुंभार समाजातील बांधवांनी तयार केलेल्या पणत्या आणि मातीच्या वस्तूंनाही या बाजारात स्थान मिळणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांना विविध वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असून, स्थानिक उत्पादकांकडून थेट खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
या दिवाळी बाजारात सहभागी होणाऱ्या स्टॉलधारकांसाठी भाजपाच्या वतीने मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक स्टॉलधारकाला एक टेबल, दोन खुर्च्या आणि विजेची व्यवस्था करून दिली जाणार आहे. त्यामुळे महिला बचत गट, गृहउद्योग आणि स्थानिक उत्पादकांना स्टॉल शुल्काचा आर्थिक भार न घेता आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करता येणार असल्याचे शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी सांगितले.
महिला बचत गटांसाठी २५ आणि कुंभार समाजासाठी १० स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उपक्रमात अधिकाधिक स्थानिक उत्पादकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेविका मेघा गांगण यांनी केले.
दिवाळी बाजारात स्टॉल लावू इच्छिणाऱ्या महिला बचत गट, गृहउद्योग चालक आणि स्थानिक उत्पादकांनी नोंदणीसाठी शहराध्यक्ष अण्णा कोदे 94223 81900 व नगरसेविका 09404448999 मेघा गांगण यांच्याशी संपर्क साधण्याच आवाहन करण्यात आले आहे.
कणकवली शहरासह तालुक्यातील महिला बचत गट, गृहउद्योग चालक आणि नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. स्थानिक महिलांनी आणि उत्पादकांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करून त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन मेघा गांगण यांनी केले. स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याबरोबरच दिवाळीच्या खरेदीतून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा उपक्रम ठरणार आहे.
