मालवण : (प्रतिनिधी)

महात्मा ज्योतिबा फुले आणि बॅरिस्टर नाथ पै यांच्या साहित्याचा, विचारांचा आणि सामाजिक जाणिवांचा आशय अभिवाचनाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने बॅ. नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर, मालवण यांच्या वतीने तालुकास्तरीय अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वाचन प्रेरणा दिन आणि सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनाचे औचित्य साधून आयोजित या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. युवा गटात ४४ आणि खुल्या गटात २० अशा एकूण ६४ स्पर्धकांनी सहभाग घेतला.
या स्पर्धेचे उदघाटन बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष पद्मनाभ शिरोडकर, साने गुरुजी वाचन मंदिराच्या अध्यक्षा डॉ. ज्योती बुवा तोरसकर आणि परीक्षकांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. एखादे गाव किंवा शहर खऱ्या अर्थाने संपन्न कशावरून ठरते, तर तेथील शाळा किती प्रगल्भ आहेत आणि ग्रंथालये किती समृद्ध आहेत, यावरून त्या गावाची खरी श्रीमंती ठरते, असे प्रतिपादन यावेळी डॉ. ज्योती बुवा तोरस्कर यांनी केले. मालवणला शतकोत्तर ग्रंथालयांची समृद्ध परंपरा लाभली असून, ती जपणे आणि नव्या पिढीमध्ये वाचनसंस्कृती रुजवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
खुल्या गटासाठी महेश धामापूरकर आणि गुरुनाथ ताम्हणकर, तर शालेय गटासाठी रघुनाथ शेवडे आणि लेखिका वैशाली पंडित यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. नाट्यवाचन आणि वक्तृत्व यांच्या मधली सीमारेषा म्हणजे अभिवाचन होय. केवळ नाट्यमय सादरीकरणापेक्षा साहित्याचा आशय आणि लेखकाचे विचार प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे, हे अभिवाचनाचे खरे सामर्थ्य आहे. ही कला सरावातून विकसित करता येते. त्यासाठी अभिवाचन कार्यशाळा आयोजित करण्याची गरज परीक्षकांनी व्यक्त केली.
यावेळी सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, स्नेहा साटलकर, प्रा. नागेश कदम, मनाली वेंगुर्लेकर, सौ. नेहा करंदीकर आदी व इतर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा केळकर यांनी केले. गौरी केळुसकर आणि सेवांगणच्या कर्मचारी वृंदाने आयोजनासाठी मेहनत घेतली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ शनिवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सेवांगण येथे होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनात पार पडणार आहे.
