Headlines

सुधाताई कामत शाळेची सुंदर आणि दर्जेदार इमारत लवकरात लवकर उभी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू….

आमदार दीपक केसरकर:नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न..

सावंतवाडी, ता. १९ : येथील कै. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर जिल्हा परिषद प्राथमिक पीएम श्री शाळा क्रमांक २च्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात व दिमाखात पार पडला. माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार दीपक केसरकर म्हणाले, “सुधाताई कामत शाळेची सुंदर आणि दर्जेदार इमारत लवकरात लवकर उभी करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू. ग्रामीण भागातील शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न राहिले आहेत. शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य केले जाईल.” जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे कौतुक केले.

ते म्हणाले, “या शाळेच्या इमारतीच्या उभारणीत अनेकांचे मौलिक योगदान आहे. शाळेच्या प्रगतीसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विशेष सहकार्य केले जाईल. शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असून तिच्या भौतिक सुविधांसाठीही प्रयत्न केले जातील. नूतन इमारत दर्जेदार असावी, यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.” तसेच कंत्राटदाराने इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रितेश राऊळ म्हणाले, “सुधाताई कामत शाळेचा अभिमान संपूर्ण जिल्ह्यासह राज्याला आहे. शाळेची गुणवत्ता नेहमीच उत्तम राहिली असून नूतन इमारत लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.” यावेळी त्यांनी आमदार दीपक केसरकर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाचेही कौतुक केले.

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक घडविण्यासाठी शिक्षण प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव यांनी हा सावंतवाडी शहरासाठी ऐतिहासिक व सुवर्ण दिवस असल्याचे सांगत, शाळेला पंचायत समितीच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी नगरपरिषद शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक देव्या सूर्याजी, नगरसेविका दुलारी रांगणेकर, बाबू कुडतरकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, ॲड. सायली दुभाषी, शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्ष भारती मोरे, केंद्रप्रमुख ठाकूर, सुरज परब, सामाजिक कार्यकर्ते नंदू गावडे, आबा केसरकर, माजी केंद्रप्रमुख म. ल. देसाई, पालक अनंत जाधव यांच्यासह पालक, नागरिक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.”

You cannot copy content of this page