ध्येय ठरवून प्रयत्न केल्यास
यश नक्कीच मिळेल:महेश धोत्रे

⚡कणकवली ता.२४-: कोरोना काळानंतर या स्पर्धात्मक युगात सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करून, एकमेकांना मदत करून, सर्वांनीच यशस्वी व्हायचे आहे. प्रयत्न करूनही अपयश आल्यास कारणांचा शोध घेऊन, ध्येय ठरवून प्रयत्न केले तर यश नक्कीच मिळेल. तसेच पालकांनीही मुलांना परीक्षेचा अतिरिक्त ताण न देता त्यांच्यातला कोरोना काळानंतर कमी झालेला आत्मविश्वास वाढवला पाहिजे असे मार्गदर्शनपर उद्गार विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीच्या वार्षिक स्नेहसंमेलन व परिमल वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि प्राथ.शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी काढले.

यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, सचिव बाळासाहेब वळंजू, विश्वस्त अनिलपंत डेगवेकर, ज्येष्ठ पत्रकार व आश्रयदाते आनंद अंधारी, प्रशालेचे मुख्याध्यापक भारत सरवदे, पर्यवेक्षक श्री पी.जे. कांबळे,सौ.व्ही. व्ही. जाधव, अच्युतराव वणवे, सुरेश बिले, महेश सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शि. प्र. मं. कणकवलीच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी माध्यमिक शिक्षणापासूनच फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केले, सर्व सुखांचा त्याग केला आणि नियोजन, मेहनत व शिस्त या त्रिसूत्रींचे पालन केले तर ते कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात.
यावेळी सचिव बाळासाहेब वळंजू यांनी पुढील परीक्षांमध्येही असेच यश मिळवा व विद्यामंदिरचे आणि कणकवली शहराचे नाव ऊज्वल करा असे आवाहन केले. तर विश्वस्त अनिलपंत डेगवेकर यांनी विद्यामंदिरची बक्षिसांची संख्या प्रत्येक वर्षी वाढतच आहे याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रशालेचे मुख्याध्यापक भारत सरवदे यांनी प्रास्ताविकामध्ये शाळेच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की दहावीचा निकाल, स्पर्धा परीक्षा सहशालेय उपक्रम अशा सर्वच क्षेत्रात विद्यामंदिर उत्कृष्ट कामगिरी करत आहे. यावेळी पर्यवेक्षक श्री पी.जे. कांबळे यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल वाचन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश सिंगनाथ, आभार प्रदर्शन जनार्दन शेळके यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीपणे नियोजन प्रशालेच्या सांस्कृतिक विभागाने केले.

You cannot copy content of this page