.⚡वेंगुर्ला ता.२३-: तालुक्यातील
परुळे येथील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिरची विद्यार्थिनी कु. अवंतिका अमेय देसाई हिने इयत्ता १० वीच्या (फेब्रुवारी २०२६) उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनात (फेरतपासणी) उत्तुंग यश मिळवले आहे. फेरतपासणीनंतर तिच्या गुणांमध्ये वाढ झाली असून, ती आता वेंगुर्ला तालुक्यात प्रथम आली आहे.
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत अवंतिकाला पुनर्मूल्यांकनापूर्वी ९७.८० टक्के गुण मिळाले होते. मात्र, गुणांवर पूर्ण विश्वास असल्याने तिने फेरतपासणीसाठी अर्ज केला होता. या पुनर्मूल्यांकनानंतर तिचे मराठी व समाजशास्त्र या विषयांमध्ये एकूण ३ गुण वाढले आहेत. त्यामुळे तिचे अंतिम गुण ५०० पैकी ४९१ झाले असून, तिने ९८.२० टक्के गुणांसह तालुक्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. परुळेसारख्या ग्रामीण भागातील शाळेत शिकून अवंतिकाने मिळवलेले हे यश अत्यंत कौतुकास्पद आहे.
अवंतिकाच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अविनाश देसाई, उपाध्यक्ष डॉ. उमाकांत सामंत, सचिव ॲड. विशाल देसाई, सीईओ अमेय देसाई, मुख्याध्यापक सचिन माने, शिक्षक, पालक व परुळे ग्रामस्थांनी अवंतिका, तिचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे वेंगुर्ला तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

