आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणास मच्छीमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.२३-: मालवण दांडी आवारवाडी येथील श्री रामेश्वर मच्छीमार संस्था कार्यालयात जिल्हा नागरिक संरक्षण विभाग, सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालय आणि रिलायन्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमास मच्छीमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समुद्रात मासेमारी करत असताना किंवा प्रवासादरम्यान कुठलीही दुखापत अगर हृदयविकाराचा झटका आल्यास अंमलात आणायच्या प्राथमिक उपाययोजनांबाबतची शास्त्रोक्त माहिती जिल्हा नागरिक संरक्षण विभागाचे सहाय्यक उपनियंत्रक अतुल जगताप यांनी यावेळी मच्छीमारांना दिली.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष जगदिश खराडे, उपाध्यक्ष हेमंत जोशी, संचालक संतोष ढोके, जीवन भगत, प्रवीण मेस्त, पंकज सादये, अर्चना आचरेकर, माजी संचालक बाबी जोगी, संदीप कोयंडे, संस्था सचिव सतेजा वायंगणकर, अन्वय प्रभू रश्मीन रोगे, वसंत गावकर, राजा सारंग, रिलायन्सचे गणपत गावडे आदींसह सागरमित्र उपस्थित होते.

समुद्रात नौकेवरील मच्छीमाराच्या हातास किंवा पायास जखम होऊन रक्तस्त्राव सुरू झाल्यास दंडावर आणि मांडीवर आवळपट्टी बांधायची. दर दहा मिनिटांनी ती एकदा थोडी सैल करून एका मिनिटाने पुन्हा घट्ट बांधायची. एखाद्याला हृदयविकाराचा झटका आल्यास त्याला दोनवेळा तोंडावाटे हवा द्यायची. ३० वेळा छातीच्या हाडांखाली मधोमध दोन्ही हाताने त्याच्या छातीवर दाब द्यायचा आदी माहिती देण्यात आली. समुद्री साप चावल्यास करायच्या उपाययोजना व फ्रॅक्चर झाल्यास डॉक्टरकडे नेताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन कलण्यात आले. आपत्तीवेळी उपयोगी पडणारे गाठींचे प्रकार व पाण्यात बुडाल्यावर कोणते उपाय करावेत, याविषयीची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

नागरी सुरक्षेतर्गत कार्यक्रमाचे कौतुक करत असताना पारंपरिक मच्छीमारांनी अनधिकृत पर्ससीन व एलईडी पर्ससीनद्वारे होणाऱ्या बेसुमार मासेमारीमुळे जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांची अन्नसुरक्षा धोक्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. शासनाने पर्ससीनवरील निर्बंध आणि एलईडी मासेमारीवरील बंदीची कोटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी मच्छीमारांनी केली.

You cannot copy content of this page