शिवसेना विरोधी गटनेते सुशांत नाईक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
⚡कणकवली ता.२२-: कणकवली येथील रविंद्रनाथ मुसळे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या
कणकवली नगरपंचायत प्रशासन व ठेकदार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. मृत्यूप्रकरणी
चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करा तसेच रविंद्रनाथ
मुसळे यांच्या सेवेप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांना कणकवली नगरपंचायतमार्फत आर्थिक मदत मिळावी.अशी मागणी शिवसेना विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यांच्याकडे केली.
शिवसेना विरोधी गटनेते सुशांत नाईक यांच्यासह नगरसेवक कन्हैया पारकर, राजू राठोड यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेत निवेदन सादर केले.कणकवली नगरपंचायत व ठेकदार यांच्यामार्फत कणकवली रेल्वे स्टेशन येथे राज्यमार्ग
१८१ कनेडी फोंडा या मार्गावर १२ फुट खोलीचे गटार खोदण्यात आले आहे. तीन दिवस गटार खोदाईचे काम सुरु आहे सदर रस्त्यावरून हे गटार जात असल्याने रस्ता देखील १२ फुट खोल खोदण्यात आला
आहे. मात्र या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेतलेली नसल्याने अथवा बॅरीकेट देखील लावले नसल्याने कणकवली शहरातील विद्यानगर येथील रविंद्रनाथ वसंत मुसळे (वय ६९ )हे ११ डिसेंबर रोजी सदर रत्यावरून दुचाकीने जात असताना खोदलेल्या गटाराचा त्यांना अंदाज न आल्याने गटारात पडून ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अपघाताच्या धक्यातून न सावरलेल्या रविंद्रनाथ मुसळे यांचा १२ डिसेंबर रोजी सकाळी मृत्यू झाला. नगरपंचायत प्रशासन व ठेकेदार यांच्या बेजाबाबदारपणामुळे त्यांना जीव गमवावा लागला. मार्गाच्या खोदाईचे काम करताना वाहतुकीच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करणे आवश्यक होते. काम पूर्ण होईपर्यंत सदर रस्ता बंद करून पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. त्याठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करणे गरजेचे होते. बॅरीकेट व सूचना फलक लावून राज्यामार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना सुरू असलेल्या कामाची कल्पना
देणे गरजेचे होते. मात्र ११ डिसेंबर रोजी सायंकाळी गटार खोदाईचे काम बंद झाल्यानंतर सदर मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना सदर ठिकाणी करण्यात आलेली नव्हती. विशेष म्हणजे सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीच्या अखत्यारीत येत असून काम सुरु करतेवेळी संबंधित विभागाला देखील कामाची पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही सदर राज्य मार्ग खोदकाम करण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग
कणकवली यांना कोणतीही कल्पना दिली गेली नाही त्यांच्याशी या मार्ग खोदकाम करण्याचा लिखित करार केला नाही त्यांचे मार्गदर्शन सुद्धा घेतले गेले नाही. तो रस्तासुरक्षेची दक्षता घेतली गेली नाही त्यामुळे त्याचा फटका रविंद्रनाथ वसंत मुसळे यांना बसला. कणकवली नगरपंचायत प्रशासन व ठेकेदार यांनी रस्ता
खोदाई करताना नियमांची पायमल्ली केल्यानेच हा प्रकार घडला. नगरपंचायत प्रशासन व ठेकेदार यांनी मुसळे यांच्या मृत्यूची कोणतीही जबाबदारी घेतली नाही. त्यामुळे सदर ठिकाणचे सी. सी. टीव्ही कॅमरे तपासून सदर प्रकरणाची आपण स्वतः सखोल चौकशी करून रविंद्रनाथ मुसळे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या
कणकवली नगरपंचायत प्रशासन व ठेकदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
