गोवा बनावटीच्या दारू वाहतूकीवर आंबोली पोलिसांची कारवाई

पाच लाख किमतीच्या गाडीसह १२ लाख ७६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

⚡सावंतवाडी ता.२१-: गोवा बनावटीची दारू वाहतूक जनरेटर बॉक्समधून करणाऱ्या संशयितला मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून पाच लाख किमतीच्या गाडीसह सुमारे १२ लाख ७६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आंबोली दूरक्षेत्रावर आंबोली पोलिसांनी केली.
सुनीलभाई मधुभाई चौधरी (३७, रा. बाजार फलिया खोड तलाव तापी गुजरात ) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आंबोली दूरक्षेत्रावर रात्रीच्या वेळी ड्युटी बजावणाऱ्या पोलीस हवालदार दीपक शिंदे व दत्ता देसाई यांना कोल्हापूरकडे बेकायदा गोवा दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला होता. आंबोली पोलीस चेकपोस्ट येथे नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करीत असताना रात्रौ अडीज वाजताच्या सुमारास सावंतवाडी दिशेकडुन एक बोलेरो पिकअप गाडी येताना दिसली. सदर बोलेरो गाडी थांबवुन तपासणी करीत असताना बोलेरो गाडीच्या हौदयामध्ये एक मोठा जनरेटर दिसुन आला. सदर जनरेटरची खात्री करीत असताना पोलिसांना संशय आला. त्यामूळे सदर जनरेटरचे पाठीमागील दरवाजाचे स्कु काढुन पाहणी केली असता जनरेटरच्या आतील भागात कोणतेही मशीन नव्हते मात्र त्यामध्ये गोवा बनावटीच्या दारूने भरलेल्या बाटल्यांचे खाकी पुठठ्यांचे बॉक्स असल्याचे दिसुन आले. त्यानंतर सदर बोलेरो पिकअप गाडीवरील चालकाच्या नावा गावाची खात्री करता त्याने त्याचे नाव सुनिलभाई मधुभाई चौधरी ( ३७, रा. बाजारफलीया खोडतलाव तापी गुजरात ) असे सांगितले. त्यानंतर पंचांसमक्ष महीद्रा कपंनीची बोलेरो पिकअप ( एम एच ०३ सी व्ही ८८९३) गाडीसह गाडीतील सुमारे १२ लाख ७६ हजार रुपये किंमतीची दारू पोलिसांनी जप्त केली. तसेच संबंधितावर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (अ ) ( ई ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. या कारवाईबाबत सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी हवालदार दत्तात्रय देसाई तसेच दीपक शिंदे यांच्यासह सहकाऱ्यांचे कौतुक केले. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होण्याचा संशय असल्याने पोलीस अधिक सतर्क झाले असल्याची माहिती यावेळी पोलिसांनी दिली.

You cannot copy content of this page