मुख्याधिकारी संतोष जिरगे
राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचा झाला शुभारंभ
मालवण (प्रतिनिधी)
खुल्या सागरात जलतरण स्पर्धा घेणे ही जोखमीची बाब आहे. तरीही मालवणच्या चिवला बीच समुद्रात राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा यशस्वी रित्या संपन्न होते. लहान मुलांपासून मोठ्या वयापर्यंतचे स्पर्धक यात सहभागी होतात. जलतरण स्पर्धा स्पर्धकांना खूप काही देऊन जाते. जलतरणपटूंनी स्वतःशीच स्पर्धा करून आपली चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी येथे बोलताना केले.
महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना व मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणच्या चिवला बीचवर दि. १७ व १८ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा होत असून या स्पर्धेचा शुभारंभाचा कार्यक्रम आज मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात संपन्न झाला. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे व महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे अध्यक्ष डॉ. दीपक परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर, ऍड. नाखवा, माजी सचिव किशोर वैद्य, डॉ. राहुल पंतवालावलकर, नगर अभियंता सौ. सोनाली हळदणकर, निल लब्दे,राजेश मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ श्रीकृष्ण परब म्हणाले, कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळामध्ये जलतरण स्पर्धा झाल्या नव्हत्या परंतु आता कोरोनाचे नियम शिथिल झाल्यावर या स्पर्धा घेण्याचा मानस होता आणि त्याला मालवण नगरपरिषद याची साथ लाभली आहे. या स्पर्धेसाठी ३० जिल्ह्यातील स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. आतापर्यंत हजार स्पर्धकांचे ऑनलाइन रजिस्टर झालेले आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्याने या स्पर्धेमुळे येणारे स्पर्धक इथले पर्यटन अनुभवतीलआणि त्यायोगे पर्यटन व्यवसालाही नवी उभारी मिळेल आपल्या मालवणात जे स्पर्धक आले आहेत त्यांचे स्वागत करतानाच त्यांच्याशी सौजन्याने वागून मालवणी मूलखाची संस्कृती जपुया .या स्पर्धेच्या निमित्ताने मालवणी संस्कृती, परंपरा याची जोपासना होतानाच ती अनुभवावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मुख्याधिकारी श्री. जिरगे म्हणाले, जलतरण स्पर्धेच्या निमित्ताने मालवणात विविध ठिकाणाहून स्पर्धक व त्यांचे पालक येतात. यामुळे स्पर्धेच्या निमित्ताने मालवणच्या पर्यटनातही वाढ होते. स्पर्धक व पालकांनी स्पर्धेबरोबरच मालवणच्या पर्यटनाचाही आनंद लुटावा, असेही जिरगे म्हणाले.
एप्रिल महिन्यात राष्ट्रीय जलतरण स्पर्धा मालवणात
यावेळी जलतरण संघटनेचे सेक्रेटरी राजेंद्र पालकर यांनी मालवण चिवला बीच येथे एप्रिल महिन्यात राष्ट्रीय स्तरावर खुली समुद्र जलतरण स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे जाहीर करतानाच या स्पर्धेतील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जलतरण पटूंची निवड केली जाणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी लहान मुलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. त्यास सुधीर गोसावी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले. तर आभार डॉ. राहुल पंतवालावलकर यांनी केले.
या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातून सुमारे १२०० ते १५०० स्पर्धक सहभागी होणार आहेत. यावर्षी ही स्पर्धा प्रथमच दोन दिवसात विभागण्यात आली असून दि. १७ डिसेंबर रोजी ५०० मीटर, १ कि.मी. आणि २ कि.मी. अंतराची स्पर्धा होणार आहे. त्यानंतर दिव्यांग स्पर्धकांची स्पर्धा होणार आहे. तर दि. १८ रोजी ३ कि.मी. व ५ कि.मी. अंतराच्या स्पर्धा होणार आहे.
