प्रगतीसाठी स्वप्ने बघून त्यांचा पाठलाग करा – विकास गवई

⚡मालवण ता.१६-:
अपयश हा आयुष्याचा एक भाग आहे. अपयश आले म्हणून वाईट वाटून घेऊ नये. त्यातून काहीतरी शिकून पुन्हा उभे राहिले पाहिजे. आपल्या प्रगतीसाठी सतत नवीन स्वप्ने बघत राहिली पाहिजेत, स्वप्ने बघणे सोडलात तर आयुष्याला काहीही अर्थ नाही. स्वप्नांचा पाठलाग केल्यास ध्येयपूर्तीचा आनंद लुटता येईल असे प्रतिपादन भंडारी हायस्कुलचे माजी विद्यार्थी आणि अमेरिकेत अर्थशास्त्रावर पीएचडी करणारे विकास गवई यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलचे माजी विद्यार्थी विकास गवई हे अमेरिका येथे विसकॉनसीन मॅडीसन युनिव्हर्सिटी मध्ये अर्थशास्त्र या विषयात पीएचडी करत असून मालवण भेटीवर आल्यावर त्यांनी भंडारी हायस्कुलला सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्याध्यापक वामन खोत यांनी विकास गवई यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर पर्यवेक्षक हणमंत तिवले, कलाशिक्षक अरविंद जाधव , प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी विकास गवई यांनी भंडारी हायस्कुल मधील आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत शिक्षक व शासनाच्या मदतीने अमेरिकेत पीएचडी करण्यापर्यंतच्या प्रवासाची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्न करत, धडपडत राहिले पाहिजे. आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना जे पडल्यावर देखील पुन्हा उभे राहतात तेच पुढे यशस्वी होतात. आयुष्यात आव्हाने ही येतच राहतात. अपयशाने न खचता अजून काहीतरी चांगले कसे करता येईल याचा विचार केला पाहिजे. आपल्या आयुष्यात आपली संगत कोणाशी आहे हे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे चांगल्या व्यक्तींच्या संगती मध्ये राहा, त्याचा चांगला परिणाम आपल्या आयुष्यावर होतो, असेही यावेळी विकास गवई यांनी सांगितले. शेवटी तिवले यांनी आभार मानले

You cannot copy content of this page