माजी आमदार प्रमोद जठार यांचे नाम. मंगलप्रभात लोढा यांना पत्र
⚡कणकवली ता.११-: महाराष्ट्रात येवू घातलेल्या रिफायनरीच्या पार्श्वभूमीवर राजापूर येथे भुवनेश्वरच्या धर्तीवर कौशल्य विकास केंद्र उभारण्याच्या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी भाजपाचे प्रदेश सचिव व माजी आमदार प्रमोद जठार यांनी राज्याचे कौशल्य व उद्योजकता विकास विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे.
तसे लेखी पत्र त्यांनी नाम. लोढा यांना सादर केले आहे. या पत्रात जठार यांनी महाराष्ट्रात राजापूर तालुक्यात बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होवू घातला आहे. या प्रकल्पात काम करण्याकरिता कुशल व अर्धकुशल अशा एक लाख मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्यासाठी भुवनेश्वरच्या धर्तीवर राजापूर येथे कौशल्य विकास केंद्र आपण व भारत सरकारच्या ऑईल व गॅस विभागाने उभे केल्यास महाराष्ट्रातील विशेषता कोकणातील तरूणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. अन्यथा या संधी परराज्यातील मुलांकडे जातील व येथील युवक केवळ अकुशल नोकरी व्यवसायाकरिता पात्र ठरतील. त्यामुळे कौशल्य विकास केंद्र उभारण्यासंदर्भात राजापूर येथे तातडीची बैठक बोलावून कार्यवाही करावी अशी मागणी जठार यांनी केली आहे.या मागणी अनुषंगाने नाम. लोढा यांनी बैठक घेण्याबाबत सकारात्मकता दर्शविली असून लवकरच संबधीत विभागाची बैठक राजापूरात होणार असल्याची माहिती जठार यांनी दिली आहे.
