मडूरा रेल्वे स्थानक परिसरात रोजगाराभिमुख प्रकल्प आणावा

बांदा सरपंच अक्रम खान यांची रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडे मागणी

बांदा
महाराष्ट्र राज्याचे शेवटचे रेल्वे स्थानक असलेले मडूरा येथे १०० एकर क्षेत्रात रेल्वे प्रशासनाने रोजगाराभिमुख प्रकल्प आणावा तसेच या स्थानकावर एक्सप्रेस गाड्याना थांबा मिळावा अशी मागणी बांदा सरपंच अक्रम खान यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मुंबई येथे केली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय संसदिय कामकाज, कोळसा व खाण मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. मंत्री दानवे यांनी देशातील प्रतिथयश उद्योगपतीना याठिकाणी आणून प्रकल्प उभारण्याचे आश्वासन दिले. तसेच दक्षिण भारताला जोडणारा कोकण रेल्वे हा दळणवळणसाठीचा महत्वाचा रेल्वे मार्ग असल्याने रेल्वे निर्मिती व दुरुस्ती कारखान्यासाठी मडुऱ्याचा विचार करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. हा प्रकल्प झाल्यास मडुरा दशक्रोशीसह बांदा शहराला देखील फायदा होणार आहे.
सरपंच खान यांनी मंत्री दानवे यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी मडूरा रेल्वे स्थानक परिसरात उद्योग आल्यास बांदा दशक्रोशीला त्याचा कसा फायदा होईल हे रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना पटवून दिले. आपण येत्या महिन्यात मडूरा रेल्वे स्थानक बाबत सगळी माहिती घेतो आणि यावर योग्य तो निर्णय घेईन असे मंत्री दानवे यांनी सरपंच अक्रम खान यांना आश्वासन दिले.
मडुरा रेल्वे स्थानक हे बांदा शहरापासून जवळ असून या प्रकल्पमुळे बांदा शहराला मोठा फायदा होणार आहे. मडुरा येथे रेल्वे टर्मिनल होण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने १०० एकर जमीन संपादित केली होती, मात्र कालांतराने राजकीय वादात रेल्वे टर्मिनल रद्द झाले. मात्र संपादित केलेली जमीन ही वापरात नसल्याने याठिकाणी रोजगारभीमुख उद्योगधंदे उभारावे. यामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होण्यासाठी मदत होणार असल्याचे खान यांनी सांगितले. मंत्री दानवे यांनी सकारात्मकता दाखवत निश्चितच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
फोटो :-
मुंबई येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत बांदा सरपंच अक्रम खान.

You cannot copy content of this page