समृध्द व आनंदी गाव संकल्पना राबविणार

शिंदे शिवसेना गटाच्या ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची माहिती

मालवण (प्रतिनिधी)

आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या निवडणुका गावातील नेहमीच्याच समस्या व मुद्दे घेऊन लढविल्या गेल्या. मात्र गावांची स्थिती बदललेली नाही. गावांच्या विकासाबाबत कोणीही बोलत नाही. म्हणूनच गावांचा विकास झालेला नाही. म्हणूनच आपण समृद्ध व आनंदी गाव हा प्रकल्प जिल्ह्यात राबविणार आहोत. हा प्रकल्प जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला असून तो राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन अधिकारी नियुक्त केले आहेत, ग्रामपंचायत निवडणुकीत ज्या गावात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची सत्ता येईल त्या गावात हा प्रकल्प राबविण्यात येईल अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

मालवण येथील बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्यासह पक्षाचे उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत, चंद्रशेखर राणे, कणकवली समन्वयक सुनील पारकर, मालवण कुडाळ विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख विश्वास गावकर, राजा गावकर, किसन मांजरेकर, अरुण तोडणकर, ऋत्विक सामंत, पराग खोत, नीलम शिंदे आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी सुधीर सावंत म्हणाले, निवडणूकांमध्ये गावातील केवळ रस्त्यांचा प्रश्न पुढे येतो. मात्र रस्ते झाले म्हणजे गावाचा विकास झाला असे नाही. गावांमध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे तरच गावाचा विकास होईल. गाव समृद्ध बनले तरच देश समृद्ध होईल. म्हणूनच समृद्ध व आनंदी गाव हा प्रकल्प आपण राबविणार आहोत. गावागावातील आरोग्य सुविधा, पौष्टिक आहार, व्यायाम, क्रीडा याकडे लक्ष दिले पाहिजे. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक गावात क्रीडा संकुल बनविण्यात येणार असून याबाबत क्रीडामंत्री ना. महाजन यांच्याशी चर्चा झाली आहे. गावागावात रोजगार निर्मितीसाठी प्रत्येक गावात उद्योग निर्माण झाला पाहिजे. म्हणूनच या प्रकल्पाअंतर्गत ग्रामीण रोजगार निर्मिती साठी पुढाकार घेण्यात येणार असून शेती व फळप्रक्रिया उद्योगातून रोजगार निर्मिती करण्यास प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच बचत गटांच्या माध्यमातूनही उद्योग निर्मिती करण्यात येईल, असेही सावंत म्हणाले.

संस्कृतीचे जतन, पाण्याची सुविधा, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन या गोष्टींचाही अंतर्भाव या प्रकल्पामध्ये असणार आहे. दोन वर्षात ५० गावात हा प्रकल्प आम्ही राबवून दाखवणार आहोत. हा प्रकल्प निवडणुकीच्या माध्यमातून लोकांसमोर घेऊन जाणार आहोत. ज्या गावात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची सत्ता येईल त्या गावात हा प्रकल्प राबविण्यात येईल. त्या त्या गावात ग्रामविकास समिती बनवून त्यात गावातील स्थानिक व मुंबईतील ग्रामस्थांचा समावेश करून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे, असेही सुधीर सावंत म्हणाले. हा उपक्रम जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला असून तो राबविण्यासाठी दोन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात प्रथम १२ गावांमध्ये प्रकल्प राबविण्यात येणार आहे असेही सुधीर सावंत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page