७४ लाख रुपयांचे सुशोभीकरण अंतिम टप्प्यात;माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती
मालवण, दि प्रतिनिधी
मालवण येथील नगरपालिकेच्या परिसरातील सुमारे ७४ लाख रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात येत असून हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे येत्या काळात नगरपालिका परिसराचे रूप पालटणार आहे अशी माहिती माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.
श्री. कांदळगावकर म्हणाले, नगरपालिका इमारत सुशोभीकरणाचे सुमारे ५६ लाख रुपयांचे काम २०१९-२९ मध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून आमच्या कालावधीत करण्यात आले. त्यामुळे नगरपालिका इमारतीला एक सौंदर्य प्राप्त झाले. त्यानंतर नगरपालिका इमारत परिसर सुशोभीत करून इमारतीच सौंदर्य अजून वाढविण्याच्या दृष्टीने सन २०२०-२१ मध्ये जिल्हास्तरीय नगरोत्थान योजनेतून सुमारे ७४ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर २३ मार्च २१ रोजी कामास कार्यारंभ आदेश देण्यात आले. आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या कामात इमारतीच्या दर्शनी भागात पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था, पालिकेत कामासाठी येणाऱ्यांच्या गाड्यांसाठी पार्किंग, अग्निशमन गाडीसाठी स्वतंत्र रोड करण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या दर्शनी भागात फाउंटन बसवण्यात येणार आहे. त्यामुळे सुशोभीकरणात अजून भर पडणार आहे. त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या दर्शनी भागात लँडस्केपिंग करत त्याठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. झाडांचे बुंधेही आकर्षक बनविण्यात येणार आहेत. आकर्षक असे प्रवेशद्वार करून प्रवेशद्वारावरच वॉचमॅन केबिन करण्यात आली आहे. अशाप्रकारे नगरपालिकेच्या इमारतीबरोबरच सभोवतालचा परिसरही आणि काही दिवसात सुशोभित होऊन पालिकेला एक नवीन सौंदर्य प्राप्त होणार आहे. आमच्या कालावधीतच हे काम पूर्णत्वास येणार होते. पण कोविड कालावधी, लाईट शिफ्टिंग इत्यादी अडथळे आल्याने हे काम होऊ शकले नाही असेही श्री. कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.
फोटो –
मालवण नगर पालिका इमारत परिसराचे सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
