समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संतोष चिकने यांचे प्रतिपादन;संविधान दिनानिमित्त समता पर्व कार्यक्रमाचे जिल्ह्यात आयोजन
⚡मालवण ता.२६-: भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकाला हक्क व अधिकार दिलेले आहेत. या हक्क अधिकारामुळेच भारतीय नागरिक स्वतंत्र आहे. भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता,बंधुता या मूल्यामुळे देशाची एकात्मता टिकून आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने आपण भारतीय संविधानातील मूल्यांचा प्रसार करूया असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी सामाजिक न्याय भवन येथे आयोजित समता पर्वाच्या उद्घाटनप्रसंगीच्या कार्यक्रमात बोलताना केले.
संविधान दिनाच्या निमित्ताने सामाजिक न्याय विभाग व बार्टी यांच्यावतीने संपूर्ण राज्यात समता पर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमांतर्गत सामाजिक न्याय भवन ओरोस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त चिकणे हे बोलत होते. यावेळी समाज कल्याण निरीक्षक अनिल बोरीकर, चित्रांगी तोरस्कर, सुनील बागुल, संतोष परुळेकर, रवींद्र जाधव धनलता चव्हाण, शिल्पा आमरे, सृष्टी रेवाळे, आरती सावंत, संदेश कसालकर, धोंडी कलिंगन, नैतिक वाघाटे, विजय कदम, संग्राम कासले, सुहास मोचेमाडकर सुजित जाधव, तसेच समाज कल्याण विभागमधील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
प्रारंभी समाज कल्याण विभागाचे सुनील बागुल यांनी सामाजिक न्याय विभाग व बार्टी यांच्या वतीने राज्यात समता पर्व या उपक्रमांतर्गत होणाऱ्या कार्यक्रमाबाबत माहिती दिली. यावेळी समाज कल्याण निरीक्षक अनिल बोरीकर यांनी भारतीय संविधान व संविधानातील मूल्ये याबाबत माहिती दिली. संग्राम कासले यांनी भारतीय संविधानाच्या निर्मिती प्रक्रियेबाबत विवेचन केले. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले.
