⚡वेंगुर्ला ता.२५-: वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसच्यावतीने सलग नवव्या वर्षी २ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता श्री शिवाजी हायस्कूल तुळस येथे खुल्या व शालेय मोठा गट व लहान गटात जिल्हास्तरीय वक्तृत्व आणि पाठांतर स्पर्धेचे (इयत्ता चौथीपर्यंत) आयोजन केले आहे.
ब-या वाईट कुठल्याही प्रसंगातून आपले राजकीय स्वार्थ साधून घेत सत्ता मिळवण्याची स्पर्धा म्हणजे राजकारण, ही व्याख्या आता राजकारणात रूढ झाल्याने राजकारणी सत्ताप्राप्तीसाठी लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवू लागले आहेत, स्वार्थी सत्ताकारण्याच्या राजकारणाने आता पातळी सोडली आहे, असे म्हणून त्याकडे किती दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला तरी राजकारणाची खालावत जाणारी पातळी कुठल्याही लोकशाहीवादी माणसाला चिंताजनक आहे यावर भाष्य करण्यासाठी खुल्या गटासाठी ‘लोकशाहीचे वस्त्रहरण होत आहे का?‘ (८ ते १० मिनिटे) हा विषय ठेवण्यात आला आहे. तर थोर समजसेविका पद्मश्री सिंधुताई यांच्या संघर्षमय जीवनावर आणि व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकण्यासाठी शालेय मोठ्या गटासाठी (८वी ते १०वी) ‘अनाथांची माय सिंधुताई सपकाळ‘ हा विषय आणि शालेय लहान गटासाठी (७वी पर्यंत) ‘गुरू ईश्वर तात माय‘ (५ ते १० मिनिटे) हा वक्तृत्वाचा विषय देण्यात आला आहे. तसेच पाठांतर स्पर्धेसाठी गणपती स्तोत्र (संस्कृत) हा विषय आहे.
वक्तृत्व स्पर्धेतील खुला गट प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे रोख रक्कम १०००, ७००, व ५००, उत्तेजनार्थ २, प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र तर शालेय मोठ्या गटासाठी अनुक्रमे ७७७, ५५५, ३३३ उत्तेजनार्थ २ प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र तर शालेय लहान गटासाठी अनुक्रमे ५५५, ४४४,३३३ उत्तेजनार्थ २ प्रत्येकी चषक व प्रमाणपत्र आणि संस्कृत गणपती स्तोत्र पाठांतर स्पर्धेसाठी एकूण अनुक्रमे ५ क्रमांक असून भेटवस्तू, मेडल आणि प्रमाणपत्र असे पारितोषिक स्वरूप असून सर्व स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल.
शालेय स्पर्धकांनी शाळेचे शिफारस पत्र किवा चालू शैक्षणिक वर्षाचे शालेय ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी रोहन राऊळ (९२८४६९८९८१) यांच्याशी संफ साधावा असे आवाहन प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.
