सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व वाहनांना टोलमाफी द्या:अबीद नाईक
⚡कणकवली ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच वाहनांना कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील टोल नाक्यावर कायमस्वरूपी टोल माफी मिळाली पाहिजे. ही राष्ट्रवादी पक्षाची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. पुणे – नाशिक रोडवर ज्या पद्धतीने चाळकवाडी टोल नाका येथे त्या भागातील सर्व वाहनांना राजस्थान येथील टोल कंपनी च्या माध्यमातून टोलमाफी देण्यात आली आहे. त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव टोलनाक्यावर संपूर्ण जिल्ह्यातील वाहनांना टोलमाफी मिळाली पाहिजे. अन्यथा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला टोल नाका सुरू होऊ देणार नाही. असा इशारा राष्ट्रवादी नेते ,नगरसेवक अबिद नाईक यांनी दिला आहे.
याबाबत बोलताना राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांनी म्हटले आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोल वसुली करिता हालचाली जरी सुरू असल्या तरी टोल करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेचा पूर्णपणे विरोध आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला पूर्णपणे टोल माफी मिळाली पाहिजे. ही भूमिका राष्ट्रवादीने यापूर्वी देखील वारंवार मांडली आहे. मात्र काही जणांकडून केवळ श्रेया करता स्टंटबाजी केली जात आहे. मात्र राष्ट्रवादी कोणत्याही स्थितीत टोल वसुली करू देणार नाही अशी भूमिका श्री नाईक यांनी घेतली. तसेच टोल वसुली सुरू केल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून टोल नाका बंद पाडेल असा इशारा देखील अबिद नाईक यांनी दिला आहे.
