मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांचा इशारा
⚡कणकवली ता.१४-:
कणकवली तालुक्यातील हळवल फाटा येथे त्या धोकादायक वळणावर मागील अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. मात्र हे अपघात होतात कसे? याला जबाबदार कोण? हायवे प्राधिकरण आणि ठेकेदार अजून किती लोकांचे बळी घेणार ? असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री यांनी उपस्थित केला आहे.
तसेच पुन्हा जर त्या जीवघेण्या वळणावर अपघात होऊन कुणाचा प्राण गेला तर हायवे प्राधिकरण व ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दखल करण्यात येईल. असा इशारा देखील दया मेस्त्री यांनी दिला आहे. त्यामुळे आता हायवे प्राधिकरण आणि ठेकेदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जर पुन्हा असे काही अपघाती प्रकार घडले तर हायवे प्राधिकरण व ठेकेदाराला जिल्ह्यात फिरुच देणार नाही. त्यांना मनसे स्टाईलने जनतेच्या प्रश्नांची जाणीव करून देऊ. असेही दया मेस्त्री म्हणाले.
त्याच बरोबर कणकवली उड्डाणपुलावर वारंवार अपघात होत असताना तेथील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांची भूमिका देखील ठाम दिसत नाही. प्रशासन यंत्रणा फक्त अपघात झाले, अपघातात कोणाचा मृत्यू झाला तर आपले सोपस्कार पूर्ण करण्यासाठी तात्काळ धावून येते मात्र लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परता दिसत नाही. तसेच या अवघड वळणावर कोणत्याही प्रकारचे सूचना फलक किंवा इशारादायक सिग्नल, हायमास्ट ची व्यवस्था अद्यापही केलेली नाही ती तात्काळ करून वाहनचालकांचा प्रवास सुखकर करण्यास प्रशासन यंत्रणेने मदत करावी. अन्यथा जनतेच्या हितासाठी मनसे रस्त्यावर उतरेल असेही मेस्त्री यांनी सांगितले आहे.
जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक यांनी सुरक्षेच्या दृष्टीने याकडे ज्याप्रमाणे जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई केली जाते त्याप्रमाणे या समस्येकडे सुद्धा लक्ष देऊन जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्यावे. महामार्ग वाहतूक पोलीस नियंत्रण यंत्रणा यांच्या माध्यमातून जिल्ह्यात ठीक – ठिकाणी सामान्य नागरिकांच्या गाड्या तसेच जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या अडवून दंड वसुली करण्यात व्यस्त आहेत मात्र अपघात प्रवण क्षेत्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारची दखता घेतली जात नाही. त्याचप्रमाणे आरटीओ देखील पूर्णपणे अनियंत्रीत असल्याचे दिसून येते. बऱ्याच वेळा बऱ्याच वाहनचालकांचे अपघात होऊन अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. याकडे आता नवीन पोलीस अधीक्षकांनी लक्ष द्यावे. अशी खंत यावेळी मेस्त्री यांनी उपस्थित केली आहे.
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी व हायवे प्राधिकरणाने हळवल फाट्यावरील त्या अपघात प्रवण क्षेत्राची पाहणी करून त्याबाबत पुन्हा एकदा ठोस निर्णय घेऊन होणारी जीवितहानी टाळावी. असेही मेस्त्री यांनी सांगितले.
