⚡कणकवली ता.०५-: कणकवली कॉलेजच्या एचपीसीएलच्या सभागृहात
रविवार ६ नोव्हेंबरला सकाळी १०. ३० वा. नागरिकांसाठी विधी सेवा महाशिबीर आणि शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष एस. जे. भारुका यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती कणकवली दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीक्ष तथा तालुका विधी समितीचे अध्यक्ष टी. एच. शेख यांनी दिली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कणकवली तालुका विधी समिती, कणकवली तालुका वकील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने व जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग, जि. प सिंधुदुर्ग, न. पं. कणकवली, सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने हा महामेळावा होत आहे.
यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, कृषी विस्तार अधिकारी सुनील पांगम, रविकांत मेस्त्री हे उपस्थित होते. या महामेळाव्यात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे उपाध्यक्ष अॅड. संग्राम देसाई व जिल्हा विधी सेवा प – धिकरणचे सचिव डी. बी. म्हालटकर यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. १०.३० ते १०.४० यावेळेत मान्यवरांचे आगमन होईल. १०.४० ते १०.४५ वा. नालसा गाणे सादर होईल. १०.४५ वा. मान्यवरांचे स्वागत होईल. त्यांनतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलाने महामेळाव्याचे उद्घाटन होईल. प्रास्ताविक आपण स्वतः करणार असून अॅड. संग्राम देसाई हे कायदेविषयक मार्गदर्शन करणार आहे. अध्यक्षीय भाषण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष एस. जे. भारुका यांचे होईल. या मेळाव्याचे सूत्रसंचालन ॲड. उमेश सावंत व आभार प्रदर्शन कणकवली तालुका वकील संघटनेच्या उपाध्यक्ष अॅड. प्राजक्ता शिंदे करतील, असे श्री. शेख यांनी सांगितले.
या महामेळाव्यात कणकवली तहसीलदार कार्यालय, कणकवली पंचायत समिती, आरोग्य विभागासह अन्य शासकीय विभागांतर्फे राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. तसेच शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते साहित्य व अनुदान वाटप केले जाणार आहे. त्याचप – माणे कणकवली पंचायत समितीतर्फे स्टॉल उभारले जाणार असून याद्वारे नागरिकांना शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाची आर्थिक व सामाजिक उन्नती होण्यासाठी अशाप -काराचा महामेळावा आयोजित केला असून कणकवली तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. शेख यांनी केले आहे. कणकवली तालुका विधी समितीतर्फे नागरिकांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून याचा लाभ नागरिकांना घेतला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
