जिल्हा नियोजनसाठी वाढीव निधी आणुया;पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे जिल्हा नियोजन सभेत आवाहन
ओरोस ता ०४-:
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी जिल्हा नियोजन आराखडा २५० कोटींचा असणे आवश्यक होते. मात्र, तो १८५ कोटींवर थांबला आहे. त्यामुळे किमान ६८ कोटींची वाढ करून तो २२५ कोटींचा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपण पालकमंत्री असताना २५० कोटींपर्यंत आराखडा नेला होता. तो मागील सरकारने कमी केला, असा आरोप केला. यावर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गेल्या अडीज वर्षात जिल्ह्यावर अन्याय झाला आहे. वाढीव निधी आणण्यासाठी व मिळालेला निधी खर्च करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य करावे. आपण वाढीव निधी आणूया, असे आश्वासन दिले.
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची सभा जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात शुक्रवारी पालकमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, खा विनायक राऊत, आ नितेश राणे, आ वैभव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आदी उपस्थित होते. सुरुवातीला निधन झालेल्या महनीय व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त वाचन करून सभेला प्रारंभ करण्यात आला.
