Headlines

आचरे येथे रंगला ‘युद्धस्य कथा रम्या’ कार्यक्रम

⚡मालवण ता.०२-: सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस आणि भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन यांचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे तर्फे न्यू इंग्लिश स्कूल आचरेच्या सभागृहात आचरे पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी “युद्धस्य कथा रम्या” हा सैनिकाच्या मुलाखतीवर आधारित कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आचरे गावचे सुपुत्र मधुसुदन सारंग, चंद्रकांत करंजे आणि कल्याण पेडणेकर या तीन सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करताना सुरेश ठाकूर यांनी त्यांची मुलाखत घेत युद्धातील प्रसंग सर्वांसमोर उभे केले.

या कार्यक्रमात प्रारंभी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरेचे अध्यक्षअशोक कांबळी यांनी सेवानिवृत्त सैनिकांचा परिचय करून दिला. कार्यवाह श्री. जाकारीस फर्नांडिस यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये तिन्ही सेवानिवृत्त सैनिकांनी वेगवेगळ्या विभागात भारताच्या सीमारेषेवर २० वर्षे केलेली सेवा, युद्धनिती, गुप्तहेर, अचानक होणारा बाॕम्ब वर्षाव, त्यांना द्यावे लागणारे उत्तर निसर्गाच्या बदलत्या स्वरुपात येणाऱ्या प्रसंगावर कशी मात करतात, सर्व सैनिक जात,धर्म, पंथ विसरून भारतमातेची लेकरे होऊन कसे लढतात याच्या रोमहर्षक कथा कथन केल्या. सुरेश ठाकूर यांनी त्यांना त्या परिसंवादात वेगवेगळे प्रश्न विचारून संवाद सतत प्रवाहित ठेवला.

यावेळी तिघाही माजी सैनिकांचा सत्कार लक्ष्मणराव आचरेकर, बाबाजी भिसळे व श्रीमती मनाली फाटक आदि मान्यवर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या गावाने केलेल्या सत्काराने तिन्ही सैनिक भारावून गेले. या कार्यक्रमाला बाजेल फर्नांडिस, सुरेंद्र संकपाळ, दिपक आचरेकर, दिपक पारकर, गोपाळ खेडेकर, गीता खेडेकर, गोविंद गावकर, अरुंधती कांबळी आदिसमवेत आचरे पंचक्रोशीतील बहूसंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page