⚡मालवण ता.०२-: मालवणात येणाऱ्या काही पर्यटकांकडून स्थानिक पर्यटन व्यवसायिकांना ज्या मारहाणीच्या घटना घडल्या त्या घटना पोलीस गांभीर्याने घेत नाहीत शिवाय सहकार्यही करीत नाहीत उलटपक्षी पोलीस स्थानिक व्यवसायिकांवरच गुन्हे दाखल करत असल्याने व्यवसाय करणे मुश्किल बनले आहे याबाबत तहसील प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाने मालवण तहसीलदार यांची भेट घेत केली
दरम्यान, पर्यटन व्यवसायिकांना होत असलेल्या मारहाणीबाबत प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसेल तर आमच्या व्यवसायांना प्रशासनेच कुलूप लावून ते बंद करावेत, अशी भूमिका घेत मालवणच्या तहसीलदाराना प्रतिकात्मक कुलूप भेट देत पोलिसांच्या कार्यपद्धती बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली तर याबाबत मालवणचे नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांनी उद्या गुरुवारी दि. ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता याविषयावर तहसील कार्यालयात प्रशासन व व्यावसायिक यांची बैठक बोलाविली आहे
मालवणात पर्यटन व्यावसायिकांवर पर्यटकांकडून होणाऱ्या हल्ल्यांबाबत आज चिवला बीच येथे जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या पदाधिकारी व व्यावसायिकांची बैठक होऊन चर्चा झाली. यानंतर व्यावसायिकांनी मालवण तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार आनंद मालवणकर व गंगाराम कोकरे यांची भेट घेऊन व्यावसायिकांची व्यथा मांडली. यावेळी अध्यक्ष बाबा मोंडकर, रविकिरण तोरसकर, शहराध्यक्ष मंगेश जावकर, महिला आघाडीच्या सौ. अन्वेषा आचरेकर, मेघा सावंत, सौ. आर्या मयेकर, विनय गावकर, मिलिंद झाड, सौ. विद्या फर्नांडिस, रुपेश प्रभू, दादा वेंगुर्लेकर, प्रसन्न मयेकर, सौ. नमिता गावकर, रामा चोपडेकर, रुपेश सातार्डेकर, दर्शन वेंगुर्लेकर, नरेश कालमेथर, भिवा शिरोडकर आदी व इतर व्यावसायिक उपस्थित होते.
पर्यटन व्यवसायिकांवर काही पर्यटकांकडून हल्ले होत असताना याबाबत पोलिसांचे कोणतेही सहकार्य मिळत नाही. व्यवसायिकांवरच गुन्हे दाखल करून व्यावसायिकांना, व्यापाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न होत असल्यास आम्ही सहन करणार नाही. न्याय मिळत नसेल तर पोलिसांकडे का जावे असा प्रश्न आता आम्हाला पडला आहे. प्रशासनामध्येही समन्वय दिसून येत नाही, स्थानिक व्यवसायिकांना प्रशासनाचे सहकार्य, पाठिंबा नाही तर प्रशासकीय यंत्रणा हव्यात कशाला असे यावेळी बाबा मोंडकर व उपस्थित व्यावसायिकांनी सांगत पोलीस व प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. आता आमच्या डोक्यावरून पाणी जात असून व्यवसायिकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत प्रशासनाला कारवाई करणे जमत नसेल तर आमच्या व्यवसायाला प्रशासनानेच कुलूप लावून व्यवसाय बंद करावा, असे यावेळी व्यावसायिकांनी सांगत नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांच्याकडे प्रतिकात्मक कुलुप सुपूर्द केले.
पर्यटन व्यवसायिकांवर होणारे हल्ले व व्यावसायिकांच्या समस्या याबाबत प्रशासनाच्या भूमिकेबाबत सर्वच प्रशासकीय विभागांची एकत्र बैठक आयोजित करावी व यावर मार्ग काढावा अशी मागणी यावेळी बाबा मोंडकर यांनी केली. त्यावर नायब तहसीलदार आनंद मालवणकर यांनी उद्या दि. ३ रोजी सायंकाळी ४ वाजता तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्याचे निश्चित केले. या बैठकीस एमटीडीसी, पोलीस यंत्रणा, नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, बंदर विभाग, वीज वितरण महामंडळ, एसटी महामंडळ, मालवण व्यापारी संघ आणि पर्यटन व्यावसायिक महासंघ आदींचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीबाबतची नोटीसही तहसील विभागाकडून संबधीत प्रशासकीय विभाग व संस्थांना पाठविण्यात आल्या आहेत.
