⚡मालवण ता.०२-: महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांच्या वयाला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त त्यांचा आनंदवन मित्र मंडळ महाराष्ट्र व डॉ. विकास आमटे अमृत महोत्सव सत्कार समितीच्या वतीने आनंदवन येथे येत्या ८ नोव्हेंबर रोजी भव्य सत्कार समारंभ आयोजित केला आहे, यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गौरव निधी गोळा करण्यात आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग संपर्कप्रमुख भूषण साटम यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
धुरीवाडा येथील हॉटेल दर्यासारंग येथे पत्रकार परिषद झाली. श्री. साटम म्हणाले, आनंदवन म्हटले की पहिली नावे येतात ती बाबा आणि साधनाताईंची. मात्र त्यांच्यानंतर आनंदवनवासींच्या हिताचा सांभाळ डॉ. विकास आमटे यांनी केला. २७ ऑक्टोबर रोजी विकास आमटे यांच्या वयाला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. विकास आमटे यांचा हा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा करायला आनंदवन मित्र, भारत जोडो साथी आणि आनंदवनाचे हितचिंतक ८ नोव्हेंबर रोजी आनंदवनात एकत्र येणार आहेत. त्यानिमित्त त्यांचा भव्य सत्कार समारंभ आनंदवन येथे ८ नोव्हेंबर रोजी आयोजित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते व डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाताई आमटे, डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थित हा समारंभ होणार आहे. डॉ. विकास आमटे यांच्या कार्याची व्यापकता लक्षात घेवून त्यांच्यावर गौरव ग्रंथ ही प्रकाशित करण्यात येणार आहे. सोबत संपूर्ण महाराष्ट्रातून शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहून गौरव निधी अर्पण करणार आहेत. दिवसभर कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. सकाळी ९ वाजता ७५ देशी प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात येईल. १० वाजता सत्काराचा मुख्य कार्यक्रम होईल, दुपारी ३ वाजता आनंदवन मित्र मेळावा आयोजित केला आहे त्यात उपस्थित आनंदवन मित्र आपले मनोगते मांडतील. ५ वाजता आनंदवन निर्मित स्वरानंदवन हा वाद्यवृंद आपली कला सादर करतील तर रात्री गझल गायक भीमराव पांचाळे हे मराठी, हिंदी व उर्दू गझल गायन सादर करतील. अशी माहितीही संपर्क प्रमुख श्री. साटम यांनी दिली. महाराष्ट्रातून व देशातून आनंदवन मित्र उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही भूषण साटम यांनी दिली.
या समारंभास ज्यांना उपस्थित राहायचे आहे अशानी आनंदवनला जरूर यावे. तसेच यासाठी गौरव निधी जमा करण्यात येत असून सिंधुदुर्गातील ज्या दात्यांना गौरव निधी द्यायचा असेल त्यांनी सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख भूषण साटम- ९४२२४३५६९८, ७७१५८२९९९९ येथे संपर्क साधावा असे आवाहनही श्री. साटम यांनी केले.
