⚡कणकवली ता.०२-: वेदांता कंपनीचे दोडामार्गहून झारखंडला २२ टन वजनाचे ८ लाख ५८ हजार रुपये किमतीचे दगडी कोळशाने भरलेले दोन ट्रक झाराप रेल्वे यार्डात न नेता चोरून परस्पर कोल्हापूर येथे अवैध विक्रीकरीता नेले जात असताना करुळ चेकपोस्ट येथे पकडण्यात आले होते. याप्रकरणी अटकेत असलेल्या ट्रक चालक ज्योतीबा गावडे (रा. बेळगांव) व नियाज युसूफ मुजावर (रा. शेर्ले, ता. सावंतवाडी) यांना येथील न्यायालयाचे न्या. टी. एच. शेख यांनी प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या सशर्थ जाचमुचलक्याचा जामीन मंजूर केला. संशयितांच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
३० ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री १० वा. च्या सुमारास करुळ चेकपोस्ट येथे कर्नाटक पासिंगचे दगडी कोळसा भरलेले दोन ट्रक पोलिसांनी वाहतूक परवान्याकरीता थांबविले. यावेळी हा चोरीचा प्रकार उघड झाला होता. याबाबत पोलिसांनी संबंधीत कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता वेदांता कंपनीचे वाहतूक प्रमुख अमृत केळुस्कर यांनी सदरचा दगडी कोळसा हा वझरे – दोडामार्ग येथून झाराप रेल्वे यार्ड येथे रेल्वे वॅगनमधून झारखंड येथे पाठविला जातो. त्याबाबत कंपनीने श्री साईबालाजी ट्रान्सपोर्ट कंपनी यांना वाहतुकीचा ठेका दिला आहे. वरील मुदतीत सदरचे ट्रक हे रेल्वे वॅगनमध्ये रिकामी झाले, अशा नोंदी करून ट्रकमधील कोळसा रेल्वे वॅगनमध्ये भरताना पडलेला २२ टन कोळसा कंपनीला परत न करता परस्पर अवैध विक्रीसाठी कोल्हापूर येथे नेला जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार संशयितांविरुद्ध भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती.
संशयितांच्यावतीने दाखल जामीन अर्जावरील सुनावणीत न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जाचमुचलक्यावर मुक्तता करताना तपासात सहकार्य करावे, जेव्हा तपासीक अधिकारी बोलावतील तेव्हा हजर होणे, साक्षीदारांवर दबाव न आणण्याच्या अटी घातल्या आहेत.
