रोणापाल येथे ‘कोरे’ची आठवभरात प्रकल्पग्रस्तांसमवेत बैठक…

जमीनधारकांना नोकऱ्या मिळण्यासाठी आग्रही;आमदार दीपक केसरकर

*💫बांदा दि.०३-:* ‘कोरे’ प्रकल्पासाठी रोणापाल व मडुरा गावातील नागरिकांनी अनेक मागण्या समोर ठेवत कवडीमोल दरात जमिनी विकल्या होत्या. परंतु अद्याप मागण्या पूर्ण न झाल्याने कोकण रेल्वेचे एमडी किंवा सीएमडी यांचे शिष्टमंडळ प्रातिनिधीक स्वरुपात प्रकल्पग्रस्तांसमवेत आठवडाभरात बैठक करणार असल्याचे आश्वासन, माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांना दिले.  मडुरा माऊली मंदिरात कार्यक्रमावेळी आमदार केसरकर बोलत होते. यावेळी शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, संघर्ष समितीचे जगन्नाथ पंडित, भिकाजी धुरी, निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरूदास गवंडे, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, मडुरा उपसरपंच विजय वालावलकर, मडुरा माजी उपसरपंच उल्हास परब, माजी ग्रा.पं.सदस्य प्रकाश वालावलकर, पाडलोस माजी सरपंच सुभाष करमळकर तसेच बाळू गावडे, भाजपचे तात्या शेर्लेकर, उदय पारिपत्त्ये, आनंद परब,  मडुरा शाखाप्रमुख श्रीकृष्ण भोगले, चेअरमन संतोष परब, दाजी सातार्डेकर  आदी उपस्थित होते. तीन दशकांपूर्वी कोकण रेल्वे महामंडळाने प्रकल्पासाठी रोणापाल व मडुरा गावातील जमीन संपादित केली होती. नोकरी मिळणार या आशेने कवडीमोल दरात शेतकऱ्यांनी जमिनी विकल्या, परंतु नोकरी किंवा अन्य मागण्या पूर्ण करण्यात आल्या नसल्याने रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांच्यासह सहकाऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी उपोषण छेडले होते. त्यावेळी माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी उपोषणस्थळी येत तुमच्या सर्व मागण्या कोकण रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेे. त्यानुसार येत्या आठवडाभरात ‘कोरे’चे एमडी किंवा सीएमडीची यांच्या उपस्थितीत कोरे शिष्टमंडळ रोणापाल व मडुरा गावातील प्रकल्पग्रस्तांची भेट घेणार असल्याचे दीपक केसरकर यांनी सुरेश गावडे यांना सांगितले. प्रजासत्ताकदिनी उपोषणावेळी दिलेल्या अर्जातील सर्व मागण्यांची पुर्तता करून रोणापाल व मडुरा गावातील प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळण्यासाठी आपण आग्रही राहणार असल्याचे आमदार केसरकर यांनी मडुरा माऊली मंदिरात सांगितले.

You cannot copy content of this page