सावंतवाडी संगीत सभेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

श्री चंद्रकांत घाटे मित्रमंडळ व केशवसुत कट्टा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

*💫सावंतवाडी दि.०३-:* ज्येष्ठ हार्मोनियम व ऑर्गनवादक कै. स्व. गोविंदराव पटवर्धन यांच्या पुण्यस्मरणार्थ सलग १६ व्या वर्षी श्री चंद्रकांत घाटे मित्रमंडळ व केशवसुत कट्टा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुलकर हायस्कूलच्या कै. सौ. लक्ष्मीबाई विष्णुपंत परुळकर सभागृहात संगीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. संगीत सभेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या संगीत सभेचे उद््घाटन सर्व मान्यवर व कलाकारांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व कै. पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी आयोजक चंद्रकांत घाटे, कळसुलकर इंग्लिश स्कूलचे सल्लागार दत्तप्रसाद गोठोसकर, संगीत अलंकार ईश्वरी तेजम, प्रदीप सरमुकादम शंकर प्रभू, मयंक टेंगसे, साईश नायक- दलाल उपस्थित होते. सुप्रसिद्ध संवादिनी वादक मयंक टेंगसे व तबला तबला साथ करणारे साईश नायक-दलाल यांच्या वादनाने व गोमंतकातील सुप्रसिध्द गायक डॉ. प्रदीप सरमोकादम यांच्या गायनाने मैफलीला रंगत आली. या कार्यक्रमाची सुरवात शंकर प्रभू गुरुजी यांच्या आनंद गीताने झाली. संवादिनीच्या एकल वादनाची सुरूवात करताना पंडित तुळशीदास बोरकर यांचे शिष्य मयंक टेंगसे यांनी पुरिया कल्याण रागातील मद्यलयीतील दोन गती सादर करताना आपली संवादिनी वादना वरची हुकूमत रसिकांना जाणवून दिली. त्यानंतर देवाघरचे ज्ञात कुणाला हे नाट्यगीत उत्कृष्टरीत्या सादर केली. संवादिनी वादनाला तबलासाथ पंडित रामदास पळसुले यांचे शिष्य साईश नायक- दलाल यांची तेवढी तोलामोलाची ठरली. द्वितीय सत्राची सुरुवात पंडित प्रभुदेव सरदार व पंडित दिनकर पणशीकर यांचे शिष्य असलेल्या गोमंतकातील डॉ. प्रदीप सरमोकादम यांच्या शास्त्रीय गायनाने झाली. आपल्या गायन मैफिलीची सुरुवात त्यांनी मारवा रागाने केली. सुरुवातीला ‘पिया मोरे आये’ हा बडा ख्याल द्रुतलयीतील पं. जगन्नाथबुवा पुरोहित (गुणिजन) यांची ‘ओ गुनियन मिल’ ही बंदिश तेवढ्याच ताकदीने पेश केली. त्यानंतर मारवा रागातील ‘बोलना बिन कब नई चैन परत’ ही पंडित आमिर खान यांची सुरेल व सुरेख बंदिश सादर केली. त्यानंतर त्यांनी तिलककामोद रागावर आधारित ‘मम सुखाची ठेव’, नंद रागावर आधारित ‘पाखरा जा’, संपूर्ण मालकंस रागातील ‘अशी सखी सहचरी’ धानी रागावर आधारित ‘घेई छंद मकरंद’ यासारखी बहारदार नाट्यपदे सादर करून रसिकांची वाहवा मिळविली. मैफिलीच्या शेवटच्या सत्रात ‘चलो मन गंगा जमुना तीर’ हे पंडित दिगंबर विष्णु पलुसकर यांचे सुप्रसिध्द गीत व त्यानंतर पंडित रामकृष्णबुवा वझे यांचे निरखुनी मधुर वदन कमला या भैरवीने आपल्या मैफिलीची सांगता केली. संगीत सभेचे प्रास्ताविक गौरवी घाटे हिने केले. मान्यवरांचे स्वागत व आभार प्रदर्शन चंद्रकांत घाटे यांनी केले. संपूर्ण संगीत कार्यक्रमाचे उत्तम निवेदन संजय कात्रे यांनी केले. यावेळी त्यांनी स्व. पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जीवनातील सांगीतिक किस्से, इतर सांगीतिक घटनाप्रसंग संगीतातील महनीय व्यक्तींचे कार्य शब्दसुमनांची गुंफण करून लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवले. कार्यक्रमाला ध्वनी संयोजक म्हणून राजन नाईक व छायाचित्रकार म्हणून भूपेंद्र सावंत यांनी मोठी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाची चहापान व्यवस्था गोविंद घळसाशी यांनी केली. या संगीत सभेला सिंधुदुर्गातील ज्येष्ठ गायक शेखर पणशीकर, प्रा. केदार म्हसकर, माणगाव हायस्कूलचे उपमुख्याध्यापक संजय पिळणकर, शशिकला आळवणी, सतीश शेजवलकर, प्रदीप शेवडे, नीलेश मेस्त्री, किरण सिद्धये, नीरज भोसल,े नितीन धामापूरकर, केतकी सावंत, समृद्धी सावंत, आदित्य आचरेकर, सुरेश पुराणिक, रवींद्र गगनग्रास, स्टेट बँक आॅफ इंडियाचे निवृत्त अधिकारी शुभा वझे, संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर, संगीत रसिक उपस्थित होते. संगीत सभेच्या आयोजनासाठी व यशस्वीतेसाठी डॉ. मधुकर घारपुरे व श्री चंद्रकांत घाटे व मित्रमंडळ व केशवसुत कट्टा सावंतवाडी यांनी विशेष परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page