⚡बांदा ता.१४-: रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान मिळते. रक्ताचा साठा उपलब्ध राहण्यासाठी समाजातील प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करणे ही काळाची गरज आहे. रक्तदान हेच सर्वोच्च समाजसेवेचे कार्य असून अशा उपक्रमांमुळे समाजात मानवतेची भावना अधिक दृढ होते, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी येथे केले.
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त बांदा येथील आनंदी मंगल कार्यालयात आयोजित भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी आयोजित कार्यक्रमात श्री कामत बोलत होते. हे रक्तदान शिबिर श्री स्वराज्य प्रतिष्ठान, बांदा, सार्वजनिक नवरात्रोत्सव व कला-क्रीडा मंडळ, कट्टा कॉर्नर बांदा, ज्येष्ठ नागरिक विकास मंच, बांदा आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. तसेच लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, शाखा बांदा यांचे सहकार्य लाभले.
शिबिराचे उदघाटन दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, बांदा पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग, पंचायत समिती सदस्य ऋतिका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, कार्याध्यक्ष महेश रेमूळकर, ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश मोरजकर, सार्वजनिक नवरात्र कट्टा कॉर्नर मंडळाचे अध्यक्ष संजय नाईक, गुरुनाथ नार्वेकर, बाबली गवंडे, लोकमान्य बँकेचे व्यवस्थापक तुळशीदास गवस, गुरुनाथ सावंत, मीनल सावंत, कमलाकर धुरी, सिद्धार्थ पराडकर, समीर परब आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालयासह विविध रक्तपेढ्यांमध्ये निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात सकाळपासूनच रक्तदात्यांची उपस्थिती दिसून आली. युवकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविला.
दरम्यान दुपारी शिबिराला भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी, स्वयंसेवकांनी तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. समाजहितासाठी अशा प्रकारचे उपक्रम यापुढेही राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ नार्वेकर यांनी केले.
फोटो:-
बांदा येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन करताना प्रमोद कामत. सोबत पंकज शिंदे, दयानंद गवस व इतर मान्यवर.
बांद्यात रक्तदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद; ३० रक्तदात्यांनी जपली सामाजिक बांधिलकी…
