⚡कणकवली ता.१४-: राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली व वैभववाडी तालुक्यातील ३२ पात्र कलाकारांना मानधन मंजुरी पत्रांचे वितरण पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात मंजुरी पत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी कलाकार मानधन समितीचे सदस्य संतोष (बुवा) कानडे व रितेश सुतार यांनी उपस्थित कलाकारांचे स्वागत केले.
कार्यक्रमास भाजप कणकवली मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, जिल्हा बँक संचालक समीर सावंत, कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे, भाजपचे पदाधिकारी तसेच कणकवली व वैभववाडी तालुक्यातील पात्र कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी कलाकारांशी संवाद साधत राज्य शासन कलाकारांच्या कलासेवेची दखल घेत असून ज्येष्ठ कलाकारांना आर्थिक आधार मिळावा यासाठी राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन योजना राबविण्यात येत असल्याचे सांगितले. कलाकारांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेत शासन त्यांच्या पाठीशी कायम उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मानधन मंजुरी पत्रे प्राप्त झाल्याने लाभार्थी कलाकारांनी समाधान व्यक्त केले. या उपक्रमामुळे ज्येष्ठ कलाकारांना आर्थिक मदत मिळण्यास हातभार लागणार असून त्यांच्या कलासेवेचा गौरव झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
