परमात्मराज महाराज:”शरीर कुठेही असो, मन अध्यात्माच्या दिशेने असावे”; दत्तयागात हजारो भाविकांचा श्रद्धेने सहभाग..
⚡बांदा ता.१४-: आध्यात्मिक सोहळ्यामध्ये बसण्याच्या स्थानापेक्षाही मनःपूर्वक सहभाग घेणे अधिक महत्त्वाचे आहे. शरीर कुठेही असो, परंतु मन नेहमी अध्यात्माच्या दिशेने आणि उन्नतीकडे असले पाहिजे, मनातील वाईट विचार, अहंकार, मत्सर आणि नकारात्मकता यांचा यज्ञाग्नीत त्याग करून आत्मविकासाचा संकल्प करावा, असे प्रतिपादन परमपूज्य परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी येथील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने आयोजित दत्तयाग सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.
याठिकाणी दत्तयाग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बोलताना परमपूज्य परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, सर्वजण एका अत्यंत मंगलमय आणि दिव्य अशा दत्तयाग रूप महायज्ञासाठी एकत्र आलो आहोत. दत्तगुरूंचे स्वरूप हे ब्रह्मदेव, विष्णू आणि शिव यांचे एकत्रित म्हणजे अभेद स्वरूप आहे. त्यामुळे या यज्ञाद्वारे केवळ एका दैवताची नव्हे, तर सर्व देवतांची तृप्ती होते, कारण हे स्वरूप सर्वांना आह्लाद देणारे आहे.
हा यज्ञ अधिक मासात एका विशेष अशा महापर्वकाळी संपन्न होत आहे. या महापर्वकाळाचे महत्त्व सांगताना एका राजाचे उदाहरण महाराजांनी दिले. ज्याप्रमाणे एका राजाने आपल्या राज्यारोहणाच्या २५ व्या वर्धापनदिनी जेलमधील सर्व कैद्यांना मुक्त केले, तसेच हा महापर्वकाळ असतो. एरवी एखाद्या कैद्याला सोडवण्यासाठी मंत्र्यांना खूप धडपड करावी लागते, पण विशेष पर्वकाळी राजा आनंदाने सर्वांना मुक्त करतो. त्याचप्रमाणे, सर्वजण जन्म-मरणाच्या चक्रात आणि बंधनात अडकलेले आहेत. या वैश्विक व्यवस्थेत पर्वकाळामध्ये एक प्रकारचा आनंद असतो, ज्यामुळे सामान्य काळात सहज न सुटणारी संकटे आणि बंधने या काळात केवळ आशीर्वादाने आणि पुण्यप्राप्तीने सहज सुटतात.
यज्ञाच्या ठिकाणी बसताना जागा कुठे मिळते, यापेक्षा तुमचे मन कोणत्या दिशेला आहे हे अधिक महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे वादळात एखादी नाव निघाली असताना त्यामध्ये बसणे महत्त्वाचे असते, जागा पुढची की मागची याने फरक पडत नाही, तसेच येथे आहे. तुमचे शरीर पाठीमागे बसले असले तरी मन अध्यात्माच्या दिशेने पुढे असायला हवे. यज्ञाच्या ज्वाळा ज्याप्रमाणे नेहमी वरच्या दिशेला जातात, त्याप्रमाणे माणसानेही जीवनात अधोगती टाळून आध्यात्मिक आणि व्यावहारिक क्षेत्रात नेहमी प्रगतीकडे पाहावे. आपल्या मनातील वाईट विचार आणि अडचणी या यज्ञात समिधेप्रमाणे जळून जाव्यात, हीच खऱ्या अर्थाने आपली भावना असायला हवी.
यज्ञ केवळ आध्यात्मिक लाभ देत नाही, तर समाजशास्त्रीय दृष्टिकोनातूनही तो महत्त्वाचा आहे. अशा धार्मिक सोहळ्यांमुळे विविध आर्थिक वर्गांमधील, विविध जातींमधील आणि विविध धर्मसंप्रदायांमधील लोक एकत्र येतात, ज्यामुळे समाजात सामाजिक एकात्मता निर्माण होते. वैज्ञानिकदृष्ट्याही, यज्ञात वापरल्या जाणाऱ्या काही विशिष्ट समिधांचा धूर हवेतील बॅक्टेरिया आणि व्हायरस वगैरे विविध मायक्रो ऑर्गनिझम्स नष्ट करण्याचे काम करतो.
काही लोक केवळ ज्ञानमार्गाचा पुरस्कार करतात, पण मन स्वच्छ नसेल तर ज्ञानाचा प्रकाश तिथे पोहोचत नाही. ज्याप्रमाणे आरशावरची धूळ साफ केल्याशिवाय आपला चेहरा स्पष्ट दिसत नाही, तसेच यज्ञ आणि इतरही सत्कर्मे ही मनरूपी आरसा स्वच्छ करण्यासाठी आवश्यक असतात. यालाच ‘मल दोष निवृत्ती’ असे म्हणतात. कर्म, उपासना आणि ज्ञान जेव्हा एकत्रित येतात, तेव्हा त्याचे विशेष फळ मिळते. खरे तर आपले संपूर्ण जीवनच एक यज्ञ आहे आणि आपला श्वासोच्छ्वास ही देखील एक यज्ञप्रक्रियाच आहे.
या भव्य अशा श्रीदत्तयाग सोहळ्याचा शुभारंभ परमपूज्य परमात्मराज महाराज तथा श्री देवीदास महाराज यांच्या उपस्थितीत आणि असंख्य भाविकांच्या साक्षीने अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
सोहळ्याच्या प्रारंभी विधिवत देवतांचे आवाहन, पूजन आणि संकल्प करण्यात आला. त्यानंतर अखंड नामस्मरणाच्या गजरात श्रीदत्तयागास प्रारंभ झाला. या यज्ञविधीचे प्रमुख पौरोहित्य श्यामभटजी मांगुर, दिगंबर जोशी व सहकारी यांनी केले. वैदिक मंत्रोच्चार, धार्मिक विधी आणि दत्तनामाच्या घोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या विशेष सोहळ्यात सहभागी झालेल्या सर्व भाविकांना खास तयार करण्यात आलेले पवित्र दत्तयंत्र कार्ड प्रदान करण्यात आले. भाविकांनी या उपक्रमाचे स्वागत करत मोठ्या श्रद्धाभावाने यज्ञकर्मात सहभाग नोंदविला.
या दत्तयाग सोहळ्यात स्त्री-पुरुष, आबालवृद्ध तसेच विविध जाती-धर्मांतील भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला आहे. समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांच्या उपस्थितीमुळे सामाजिक समरसता आणि आध्यात्मिक एकात्मतेचे दर्शन घडत आहे.
दोन दिवस चालणाऱ्या या श्रीदत्तयाग सोहळ्यात विविध धार्मिक विधी, होम-हवन, नामस्मरण आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुर्मिळ आध्यात्मिक योगावर आयोजित करण्यात आलेल्या या महायज्ञामुळे परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भाविकांची गर्दी सातत्याने वाढत आहे.
फोटो:-
आडी येथे भाविकांना मार्गदर्शन करताना परमपूज्य परमात्मराज महाराज. सोबत दत्तयागासाठी उपस्थित असलेले भाविक.
