नगरसेवक तपस्वी मयेकर यांची टीका..
⚡मालवण ता.१४-:
मालवण शहरात धुरीवाडा येथे शनिवारी रात्री आग लागून गॅरेज मधील गाड्या जळाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून आग विझविण्यासाठी अग्नीशमन बंब उपलब्ध होऊ शकला नाही. माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मालवणसाठी नवीन अग्निशामक बंब उपलब्ध केला असताना केवळ मोटार बंद पडल्याच्या किरकोळ कारणामुळे हा बंब गेल्या तीन महिन्यांपासून बंद अवस्थेत असून ही गंभीर बाब आहे. त्यामुळे या निष्काळजीपणाला जबाबदार कोण, असा सवाल ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून उपस्थित करत बंब उपलब्ध न होणे ही प्रशासनाची नामुष्की असल्याची टीका टीका केली आहे.
अग्निशामक सेवा ही अत्यावश्यक सेवा असून पर्यटनाच्या दृष्टीने झपाट्याने विकसित होत असलेल्या मालवणसारख्या शहरात अग्निशामक बंब दीर्घकाळ बंद राहणे ही गंभीर बाब आहे. माहितीनुसार, संबंधित अग्निशामक बंब मार्च २०२६ पासून बंद असून, त्याच्या दुरुस्ती किंवा पर्यायी बंब उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिकेने १७ एप्रिल २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला पत्रही पाठविले होते. यावरून हा प्रश्न तीन ते चार महिन्यांपासून प्रलंबित असल्याचे स्पष्ट होते, असे नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी म्हटले आहे.
केवळ मोटार दुरुस्तीसारख्या किरकोळ कारणामुळे संपूर्ण यंत्रणा ठप्प राहणे ही प्रशासनासाठी नामुष्कीची बाब आहे. जर एवढ्या किरकोळ खर्चामुळे आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे अग्निशामक बंब बंद राहणार असेल, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? काल घडलेली दुर्दैवी घटना पुन्हा घडली आणि त्यामागे नगरपालिकेचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला, तर त्याला जबाबदार कोण राहणार? या प्रश्नांची उत्तरे मालवणच्या नागरिकांना मिळाली पाहिजेत, असेही तपस्वी मयेकर यांनी म्हटले आहे.
