सावंतवाडी-:सावंतवाडीतील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर असुन, विविध विषयांबाबत जनजागृती, वैद्यकीय, प्रशिक्षण यासह शैक्षणिक कार्य प्रतिष्ठान द्वारे केले जाते. या सर्व कार्यात प्रतिष्ठानचे शैक्षणिक कार्य खुप महत्वाचे असून, यात ‘शब्दगंध’ शालेय वाचनालय, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, विद्यार्थ्यांना छत्री, सायकल तसेच इतर आवश्यक साहित्याचे वाटप केले जाते. कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे यावर्षी शाळा उशिरा सुरू झाल्या असून, कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक कोंडीने अनेक पालक त्रस्त झाले आहेत. त्यांना थोडा हातभार म्हणून प्रतिष्ठानतर्फे त्यांच्या पाल्यांना एकूण ७० “स्कुल किट” देण्यात आल्या आहेत. यात किट मध्ये १ स्कुल बॅग, १ एक्झाम पॅड, १ टिफिन डबा, ३ लॉंग बुक्स, कंपास पेटी, फाईल फोल्डर, पेन्स ई. साहित्य देण्यात आले आहे. हे किट कै. बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालय, दाणोली ; श्री शिवाजी विद्यालय, विलवडे ; श्री रवळनाथ विद्यामंदिर, ओटवणे ; श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, माजगाव ; मळगाव इंग्लिश स्कुल, मळगाव ; सेंट्रल उर्दू हायस्कूल, सावंतवाडी ; वि. स. खांडेकर माध्यमिक शाळा, सावंतवाडी ; पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय, कारीवडे या सावंतवाडी तालुक्यातील प्रशालेमधील विद्यार्थ्यांना हे साहित्य देण्यात आले आहे. यावेळी विशेष म्हणजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचे पाल्य नेहमी प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमात हिरीरीने सक्रिय असतात. आपल्या वाढदिवशी ते प्रतिष्ठानला त्यांच्या लहानशा जमा रकमेतून आर्थिक मदत करीत असतात. त्यांचा सेवाभाव टिकावा व प्रतिष्ठानविषयी त्यांच्या मनातील स्नेह वृद्धिंगत व्हावा. तसेच त्यांनाही शाबासकीची थाप म्हणून यावेळी सिंधुमित्रांचा बाल चमुला देखील स्कुल किट देण्यात आली आहे. विशेष म्हणजे दयासगर छत्रालय, रोणापाल येथील निवासी विद्यार्थ्यांना “स्कुलकिट” देण्यात आले. याशिवाय या वसतिगृहास टूथपेस्ट, टूथब्रश, ओडोमॉस क्रीम हे साहित्य देखील देण्यात आले आहे. प्रतिष्ठानने घेतलेल्या या उपक्रमाचे प्रशालेतील शिक्षक तसेच वसतिगृहाचे प्रमुख श्री जीवबा वीर यांनी कौतुक करत आभार व्यक्त केले आहेत. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिष्ठानचे अँड. शामराव सावंत, प्रा. सौ रमा सावंत, डॉ. सौ मुग्धा ठाकरे, दिपक गावकर, अँड्र्यू फर्नांडिस, सीए लक्ष्मण नाईक, डॉ. शंकर सावंत, भार्गवराम शिरोडकर, आनंद मेस्त्री, आसिफ शेख, भगवान रेडकर, प्रशांत कवठणकर, सौ अनघा शिरोडकर, सौ अँटोनेट फर्नांडिस व सिद्देश मणेरीकर यांनी परिश्रम घेतले आहेत.
सिंधुमित्र प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थांना ‘स्कुल किटचे’ वाटप
